मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे ही तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती सोशल माध्यमांवर सक्रीय असल्यामुळेही लोकांना खूप आवडते. तिची स्वत:ची एक स्टाईल आहे. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं फॅशन करणं हे सगळं खास तिचं आहे. त्याचंच तिच्या चाहत्यांना आकर्षण वाटतं. इन्स्टाग्राम रिल या सोशल माध्यमावर तिने नुकताच एक गमतीशीर व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत ती छोट्या मुलाच्या आवाजावर आपले ओठ हलविते आहे. हा व्हिडीओ पाहून श्रुतीच हा गोड आवाज काढतेय की काय असे चाहत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे तिचा हा व्हिडीओ आज भलताच व्हायरल होतोय.
या व्हिडीओचा साऊण्ड जितका गोड आहे तेवढीच श्रुती स्वत:ही गोड दिसतेय. तिच्या लिप सिंकमुळेच हा व्हिडीओ आणखी छान झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यातल्या कॅप्शनमध्ये श्रुती म्हणते, मी लिप सिंक करण्याचा सराव करत होते, तेव्हा हा व्हिडीओ माझ्या नकळत शूट करण्यात आला आहे. काहीही असले तरी तो व्हिडीओ पाहताना खूपच गंमत वाटतेय.
दरम्यान, श्रुती मराठे लवकरच आपल्याला दोन नव्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यातला एक आहे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ आणि दुसरा आहे ‘नांगा रोम्बा बिझी’ हा तिचा तमीळ सिनेमा. मुळात हा तमीळ चित्रपट कन्नडमधल्या ‘मायाबाजार’चा रिमेक आहे.