महाराष्ट्राच्या कुस्तीत नावलौकिक असलेले लाल मातीतील दादा पैलवान, ‘हिंद केसरी’च्या पहिल्या गदेचे मानकरी, अनेक पदकविजेते मल्ल घडविणारे आणि कुस्तीपटूंचे प्रेरणास्थान असलेले वस्ताद श्रीपती खंचनाळे यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. कुस्तीतील दादा माणूस गेल्याने पुस्तीची पंढरी असलेल्या करवीरनगरीवर शोककळा पसरली. कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित व रोहित, मुलगी पौर्णिमा, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
राष्ट्रपतींकडे केली होती निकाली कुस्तीची विनंती
पहिल्या ‘हिंद केसरी’च्या किताबी लढतीत श्रीपती खंचनाळे यांनी ‘रुस्तुम-ए-पंजाब’ पैलवान बत्तासिंग यांना थोबीपछाड दिली होती. यावेळी गुरू हनुमान सिंग हे पंच होते. तुल्यबळ लढतीमुळे पंचांनी ही कुस्ती अनिर्णित घोषित केली. मात्र, श्रीपती खंचनाळे यांच्या मनाला काही हा निर्णय पटला नाही. त्यांनी त्या रात्री देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची भेट घेऊन ‘हिंद केसरी’पदाचे हे पहिलेच वर्ष असल्याने ही कुस्ती निकालीच करावी, अशी विनंती केली. राष्ट्रपतीही कुस्तीशौकीन असल्याने त्यांनीही ही विनंती मान्य केली. दुसऱया दिवशी 20 डिसेंबर 1959 रोजी दिल्लीतील न्यू रेल्वे स्टेडियमवर सकाळी 10 वाजता निकाली कुस्ती झाली. यामध्ये श्रीपती खंचनाळे यांनी ‘घुटना’ डावावर बत्तासिंगना चीत करून हिंदुस्थानातील पहिला ‘हिंद केसरी’ होण्याचा सन्मान मिळवीत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील एकसंबा गावचे असलेले श्रीपती खंचनाळे यांनी 1959मध्ये ‘पंजाब केसरी’ बत्तासिंग याला पराभूत करून देशातील पहिली हिंद केसरी’ची गदा मिळवून इतिहास घडविला. याच वर्षी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवीत मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताबही पटकावला. 1958, 1962 व 1965मध्ये ‘ऑल इंडिया चॉम्पियन’ स्पर्धाही जिंकून त्यांनी पुस्तीमध्ये स्वतःचा व कोल्हापूरचा दबदबा निर्माण केला होता.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबीयांनी त्यांना शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह ठाण्याचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनतर्फे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी श्रीपती खंचनाळे यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीचा भारही उचलला होता. याचबरोबर कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडे पाठपुरावा करीत त्यांच्या उपचारांसाठी सरकारकडूनही पाच लाखांची मदत मिळवून दिली होती.
खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच पुस्तीक्षेत्रात शोककळा पसरली. कोरोनामुळे बंद असलेल्या तालमी आता कुठे सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच, पैलवानांना दिवंगत खंचनाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी रांग लावावी लागली. खंचनाळे यांची पुस्तीतील जडणघडण शाहूपुरी तालमीत झाल्याने त्यांचे पार्थिव या तालमीत अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांचे पार्थिव रुईकर काॅलनी येथील निवासस्थानी नातेवाईकांना पाहण्यासाठी काही काळ ठेवल्यानंतर पंचगंगा स्मशानभूमीजवळील रुद्रभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी शाहूपुरी तालमीचे दिग्गज पैलवान वस्ताद रसूल हनिफ, शाहूपुरी तालमीचे एकेकाळचे पैलवान, माजी खासदार धनंजय महाडिक, तालमीचे सध्याचे वस्ताद व आंतरराष्ट्रीय पैलवान रवींद्र पाटील, स्पोर्टस् अॅथॉरिटी ऑफ इंडियाचे (साई) प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, पैलवान संतोष दोरवड, वस्ताद करजगार व तालमीचे पैलवान उपस्थित होते.
अल्पपरिचय
श्रीपती शंकर खंचनाळे यांचा जन्म 10 डिसेंबर 1934 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते. बेळगाव जिह्यातील चिक्कोडी येथील एकसंबा या कृष्णा नदीकाठच्या गावात त्यांचे बालपण गेले. कुस्तीवरील प्रेम पाहून आई-वडिलांनी खंचनाळे यांना मोठा पाठिंबा दिला. त्यांचे मराठी, हिंदी, कन्नड आणि पंजाबी या भाषांवर प्रभुत्व होते. पुस्तीसाठीच त्यांनी शाळा सोडली होती. सातव्या वर्षी सुरू केलेली कुस्ती त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी बंद केली. चपळता, वेग, ताकद ही मल्लविद्येतील प्रमुख अस्त्रे होय. खंचनाळे यांनी ही अस्त्रे आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यावेळी ते पहाटे 4 वाजता उठत असत. तब्बल 3000 बैठका, 3000 जोर, अर्धा तास माती खणणे, हे झाल्यावर मल्लखांब अशा गोष्टी ते करीत असत. सकाळी व सायंकाळी ते तीन-तीन तास व्यायाम करायचे. कोल्हापूर येथील महान मल्ल मल्लाप्पा थडके आणि विष्णू नगराळे यांचा विशेष प्रभाव खंचनाळे यांच्यावर होता. त्यांच्या काळात पंजाब आणि पाकिस्तान प्रांतातील मल्लांचा मोठा दबदबा होता. मात्र, खंचनाळे यांनी तेथील मल्लांना लोळवून त्यांची कुस्तीतील मक्तेदारी मोडीत काढली. कुस्तीतील अतुलनीय कामगिरीमुळेच खंचनाळे यांना ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन पुरस्कार’, ‘एकलव्य पुरस्कार’, ‘द्रोणाचार्य पुरस्कार’ व ‘महाराष्ट्रभूषण’ यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. याचबरोबर कर्नाटक सरकारनेही त्यांना ‘कर्नाटकभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या एका शिष्याने ‘हिंद केसरी’, तर तिघांनी ‘महाराष्ट्र केसरी’ किताब जिंकला. कुस्ती खेळणे सोडल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात विविध जबाबदाऱया पार पाडल्या. त्यात प्रशिक्षक म्हणून त्यांनी असंख्य मल्ल घडविले. त्यांनी असंख्य स्पर्धांमध्ये पंच म्हणूनही काम केले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर ते बरीच वर्षे पदाधिकारी होते. महाराष्ट्र शासनाने श्रीपती खंचनाळे यांना कोल्हापुरातील रुईकर काॅलनीमध्ये घर दिले. याचबरोबर त्यांना सरकारकडून तीन हजार रुपये मानधन दिले जात होते.
सौजन्य- सामना