दादा म्हणाले, `इंग्लिश’मध्ये नको. कारण मजकुरासाठी साऊथ इंडियन लोकांच्या पाया पडावं लागेल. तुला अनुभव आलाच आहे. तेव्हा मराठीत काढा!’ बंधूंना हा विचार एकदम पसंत पडला. झालं. आमचं नावासाठी डोकं सुरू झालं. `तिरंदाज’ ठेवावं की `अंजन’? भाऊ दादांकडे गेला. दादा स्वस्थ खुर्चीवर बसले होते, म्हणाले, `मार्मिक’! मी बाहेर गेलो होतो. आल्यावर त्याने मला सांगितलं. दादांच्या तोंडातून ब्रह्यवाक्यच यायचं नेहमी! काय नाव `मार्मिक’, मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक.
भावाला (बाळासाहेब ठाकरे) फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकाराची पोस्ट मिळाली. मी फेमस सोडली नि एच.एम.व्ही.मध्ये राहिलो. नंतर ऑल इंडिया रेडिओ मुंबईवर वादनकार म्हणून काम करीत असलो तरी ज्या ज्या वेळी भाऊ सप्लिमेंट्सच्या कामासाठी बोलवायचा त्या वेळी जायचो. त्या वेळी फ्री प्रेसची निरनिराळ्या विषयांवरची सप्लिमेंटस खूप निघायची. माझ्या लक्षात राहिलं ते `झाशी की रानी’चं सप्लिमेंट. पानभर मोठ्ठ मेहताबचं लाइन ड्रॉइंग माझ्या भावानं केलं होतं. तत्पूर्वी आर. के. लक्ष्मण भावाच्या समोरच्या बाजूस टेबलावर बोर्ड ठेवून खुर्चीवर बसायचा! नंतर तो `टाइम्स ऑफ इंडिया’त गेला, पण याचवेळी फ्री प्रेसमधली व्यंगचित्रं पाहून `असाही शिनबुन’ या करोडो खपाच्या जपानी दैनिकात महिन्याला सात-आठ व्यंगचित्रं काढून देण्याची विनंती त्यांनी भावाला केली नि त्याने ती मान्य केली आणि नंतर `चर्चिल बायोग्राफी इन कार्टून्स’ या जाड्याजुड्या ग्रंथात जगातल्या झाडून सगळ्या देशातल्या व्यंगचित्रकारांना ही संधी मिळाली, पण `इंडिया रिप्रेझेंट थॅकरे’ असा उल्लेख करून चर्चिल यांची भावानी काढलेली तीन व्यंगचित्रं छापली आणि व्यंगचित्रकार बाळ ठाकरे जगविख्यात झाले!
पुढे आम्हाला एल.आय.सी.ची रंगीत कार्टून फिल्म करायला मिळाली तीही आम्ही दोघांनी करून दिली. पण नंतर त्या फिल्मचा नाद आम्ही सोडून दिला. कारण ती विमा कंपनीसाठी फिल्म असल्याने नेहमी चित्रातल्या स्त्रीच्या नवर्याला मारावं लागायचं. मग तो मेल्यावर त्याच्या बायकोचं विमा काढल्यावर कसं भलं व्हायचं ते सारखं दाखवायला लागायचं. त्यामुळे बंधू त्या निर्मात्यावर भडकले नि कंटाळून सोडून दिलं. सारखं त्या बाईच्या नवर्याला रोज किती वेळा मारायचं?
पुढे फ्री प्रेसमधल्या पत्रकारांनी मिळून नवीन इंग्लिश पेपर सुरू केला `न्यूज डे’ नावाचा. त्याचं बालपण किती कष्टाचं असतं हे अनुभवलं. पेपरचं ऑफिस भवानी शंकर रोड, दादर येथे होतं. दररोज रात्री आम्ही तेथे सर्व पाहायला जायचो. कारण जाणं अगत्याचं होतं. आम्ही सोडले तर इतर पत्रकार साऊथ इंडियन होते. नायर, अय्यर, हरिहरन वगैरे वगैरे. त्यातला एकजण क्रीडवर बातमी आली की पहिली बातमी लहान करायचा कसा ते मी अभ्यासत होतो. त्यानंतर त्याच्या थाबड्या घेऊन गाडीतून आर.एम.डी.सी. प्रेसमध्ये घेऊन जायचो. नंतर त्याची भलीमोठी बांगडी बनवायचे. ती बांगडी मशीनवर टाकली की ती प्रिंट होऊन पेपर बाहेर पडायचा. थप्पेच्या थप्पे बाहेर यायचे. दुसर्या बाजूने या प्रकाराचा मला फायदा झाला. आम्ही जेव्हा `सांज मार्मिक’ हे दैनिक चालू केलं त्या वेळी या गोष्टी माझ्या नजरेसमोर असल्यामुळे त्याचा मी चांगल्या तर्हेने उपयोग केला.
`न्यूज डे’ सुरुवातीला पत्रकारांना काही मिळवायचं नाही, ते मिळणार नव्हतं. म्हणून क्राईम रिपोर्टर अय्यरला विचारलं की, `व्हॉट अबाऊट यू अय्यर?’ अय्यर म्हणाला, `आय अॅ म बॉरोइंग मनी फ्रॉम माय फ्रेंड्स, नाऊ आय विल बॉरो मोअर!’ असा होता अय्यर! ‘न्यूज डे’मधून आमचे बंधू काही महिन्यांनंतर बाहेर पडल्यावर काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. पण प्रबोधनकारांनी एक मंत्र दिला होता की, माणसाने कधीही हताश होऊन जाऊ नये. नव्या क्ऌप्त्या काढाव्यात! त्याप्रमाणे बंधूंनी एक डमी तयार केली. शंकर्स वीकली होतं, पण आपण दुसरं चांगलं काढलं तर! त्याचं नाव होतं `कार्टुनिस्ट’. मोठ्या बंधूंनी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा दादा म्हणाले, `इंग्लिश’मध्ये नको. कारण मजकुरासाठी साऊथ इंडियन लोकांच्या पाया पडावं लागेल. तुला अनुभव आलाच आहे. तेव्हा मराठीत काढा!’ बंधूंना हा विचार एकदम पसंत पडला. झालं.
आमचं नावासाठी डोकं सुरू झालं. `तिरंदाज’ ठेवावं की `अंजन’? भाऊ दादांकडे गेला. दादा स्वस्थ खुर्चीवर बसले होते, म्हणाले, `मार्मिक’! मी बाहेर गेलो होतो. आल्यावर त्याने मला सांगितलं. दादांच्या तोंडातून ब्रह्यवाक्यच यायचं नेहमी! काय नाव `मार्मिक’, मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक.
`मार्मिक’ हे प्रथम आम्ही `न्यूज ग्लेझ’ या गुळगुळीत न्यूज प्रिंटवर छापायचं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही दोघांनी जाऊन पाच हजार रुपयांचा तो पेपर घेऊन बँकेच्या हवाली केला जिवादिवशी बिल्डिंगमधील ऑफिसात. तोच मी लागेल तसा ५०, ५० रिमे घेऊन खटार्यात टाकायचो नि त्या खटार्याबरोबर चालत चालत येऊन प्रिंटिंग प्रेसमध्ये टाकायचो. काही वेळा रात्री प्रिंटर्सबरोबर जाऊन मशीनच्या शेजारी उभं राहून नीट प्रिंटिंग कव्हर होतंय की नाही ते बघायचो. सकाळी सातच्या शिफ्टचे कामगार येऊन सांगायचे की, `अहो साहेब जा!, तेव्हा मी घरी यायचो.
`मार्मिक’च्या एजंट लोकांच्या ताळेबंदीचा जमाखर्च स्वत: जातीने पाहायचो. आम्ही घरातले दोन बंधू नि वहिनीदेखील पॅकिंग करायला बसायच्या. मग ते सारं रात्री केलेल्या बाहेरच्या मुलांनी सकाळी पोस्टात नि रेल्वेवर पाठवायचं. आम्ही दर आठवड्याला राजकीय व्यंगचित्र काढायचोच, पण सुरुवातीच्या काळात सोशल व्यंगचित्रांचा भडिमार वेळ मिळेल तसा करून ठेवायचो. नंतर इतर व्यंगचित्रकारांना प्रोत्साहनाखातर मुभा देऊ लागलो.
‘मार्मिक’च्या प्रारंभिक वाटचालीतील राम-लक्ष्मणाची जोडी म्हणजे स्व. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांतजी ठाकरे. ‘मार्मिक’च्या अंकांमध्ये श्रीकांतजींची अनेक व्यंगचित्रं प्रकाशित झाली आहेत. त्यांचा ‘बन्याबापू’ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. तो सर्वसामान्य मराठी माणसांचे प्रतिनिधित्व करायचा. त्यांच्या भावी कामगिरीची चुणूक दाखवणारं हे पहिल्याच अंकातलं व्यंगचित्र.