अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातलीच, पण सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉक्स ऑफीसवर धमाल केली. तानाजी हा सर्वक्षेष्ठ मावळा आहेच, पण प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आदराचं स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज या सिनेमात पाहायला मिळाल्याने प्रेक्षक आनंदले. ही भूमिका अभिनेता शरद केळकर याने जिवंत केली होती. त्यामुळे सिनेमातील अजय देवगणच्या तानाजीच्या भूमिकेपेक्षा शरद केळकरने केलेली शिवरायांची भूमिका जास्त गाजली.
2020 या वर्षाचा आरंभच या दमदार रोलमुळे झाल्याने शरद केळकर सुखावला. महाराजांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभल्याने आपण धन्य झाल्याची भावना शरदने नुकतीच सोशल मिडीयावरुन व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेतला आपला फोटो शेअर करत तो म्हणतो, ‘२०२०ची सुरवात इतकी सुरेख होती की छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रित केलेल्या चित्रपटात साक्षात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर सादर करता आली. तुम्ही सर्वांनी जे मला प्रेम दिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.’