टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने चेन्नईतील एम. चिन्नास्वामी मैदानात इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा माइलस्टोन गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये बळींचे ‘त्रिशतक’ झळकावण्याचा पराक्रम इशांतने केला आहे. टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळी घेणारा तो फक्त तिसरा वेगवान गोलंदाज आहे.
इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत चौथ्या दिवशी इशांत शर्मा याने डॅनियल लॉरेंस याला पायचित केले. कसोटी क्रिकेटमधील हा त्याचा 300 वा बळी होता. इशांत शर्मा याच्या आधी फक्त डावखुरा गोलंदाज झहीर खान आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनीच अशी कामगिरी केली आहे. आता इशांतलाही त्यांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे.
इशांत शर्मा याने 98 व्या कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला. कपिल यांच्या नावावर 131 कसोटीत 434 तर झहीर खान याच्या नावावर 92 कसोटीत 311 बळींची नोंद आहे. इशांतकडे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 100 वा कसोटी सामना खेळण्याचीही संधी आहे, तसेच पुढील तीन कसोटीत 12 बळी घेत झहीर खान याचा विक्रम मोडण्याचीही सूवर्णसंधी आहे.