खंदकखोर पाकिस्तानची घुसखोरीची खुमखुमी अद्याप कायम असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने आयएसआयच्या मदतीने जम्मू-कश्मीरच्या सीमावर्ती भागात शिरकाव करण्यासाठी पानसर गावात उघडणारा भुयारी खंदक खोदल्याचे स्पष्ट झाले. गेल्या 10 दिवसांत पाकड्यांनी सीमेवरून आरपार जाण्यासाठी खोदलेला हा दुसरा बोगदा आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी जम्मू-कश्मीरमधील हिरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी 150 मीटर लांब आणि 30 फूट खोल असून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती असे हिंदुस्थानी गुप्तचर संघटनांचे म्हणणे आहे. या बोगद्याच्या निर्मितीबाबत सुरक्षा यंत्रणा अधिक तपास करीत आहेत. बीएसएफने जून 2020 मध्ये याच भागात शस्त्रास्त्र आणि स्फोटके घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेलिकॉप्टर पाडले होते. जवानांनी नोव्हेंबर 2019 मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्नदेखील हाणून पाडला होता.
सौजन्य : दैनिक सामना