मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्या तरी राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र उद्या सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने तेथे शाळा सुरू होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना चाचणी अनिवार्य केली होती. त्यानुसार कोविड आरटी-पीसीआर चाचणी केली गेली आणि त्यात अनेक शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची आकडेवारी उघड झाली आहे.
रत्नागिरी जिह्यातील 2591 शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात चार शिक्षक पॉझिटिव्ह सापडले, तर सोलापूर जिह्यात ग्रामीण भागातील 178 शिक्षकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोलापूर शहरात आतापर्यंत प्राप्त झालेले सर्व 330 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागात जवळपास 10 हजार 799 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पंढरपूर तालुक्यातील 66 शिक्षक, मंगळवेढा तालुक्यातील 22, सांगोला 21, माळशिरस 20, बार्शी 15 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत, तर सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 1199 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 330 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नाशिक जिह्यातील शिक्षकांची कोरोना चाचणी सुरू करण्यात आली होती. नाशिक जिह्यात आतापर्यंत 45 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीणमध्ये 37 तर नाशिक शहरात 8 शिक्षक पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नागपूर जिह्यात आतापर्यंत 41 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागात 25 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूर शहरात 16 शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
सौजन्य : दैनिक सामना