चिमणराव सायकल चालवायला शिकत होते… शिकत होते म्हणजे, मागे सोटाधारी गुंड्याभाऊ बळजबरीने शिकवत असल्यामुळे चिमणरावांकडे शिकण्यावाचून पर्याय नव्हता. चिमणरावांचा जरा तोल गेला किंवा काही चूक झाली की गुंड्याभाऊचा सोटा टाळक्यात बसत होता.
चिमणरावांनी एकदोनवेळा अस्फुट प्रतिकाराचा प्रयत्न केला, अरे पण गुंड्या, फार अवघड जातंय रे सायकल चालवणं शिकायला, तसं गरजेचंही नाहीये ते.
गुंड्याभाऊ सोटा उगारून म्हणायचे, चिमण, तुला शरम कशी रे वाटत नाही? तिकडे सीमेवर सैनिक देशरक्षणासाठी डोळ्यांत तेल घालून लढतायत आणि तू देशासाठी साधी सायकल चालवायला शिकू शकत नाहीस?
अखेर दोन दिवसांनी चिमणराव सोट्याचे टोले खात सायकल चालवायला शिकले. आता ते सायकलवरून बऱ्याच दूरपर्यंत पाऊल न टेकता पोहोचले, वळले आणि त्यांनी दातओठ खाऊन विद्युतगतीने पेडल मारायला सुरुवात केली. गुंड्याभाऊंना काही कळायच्या आत सायकल त्यांच्यावर समोरून धडकली, गुंड्याभाऊंची टोपी उडून गटारात पडली, सोटा भिरकावला गेला,
ओय ओय ओय, मांड्या पोट चोळत चोळत पराकाष्ठेच्या वेदनेने पिळवटलेल्या चेहऱ्याने गुंड्याभाऊ म्हणाले, अरे, काय रे ही रेड्यासारखी धडक मारलीस चिमण?
चिमणराव खुदकन् हसून म्हणाले, गुंड्या, अरे तुझ्याच सांगण्यावरून मी जिवाच्या कराराने देशासाठी सायकल चालवतोय आणि तू देशहितासाठी तिची साधी क्षुल्लक धडक सहन करू शकत नाहीस?
-मामंजी