बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते, ‘ट्रजेडी किंग’ दिलीप कुमार यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी चाहत्यांना केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
मुलाखतीत सायरा बानो म्हणाल्या, ’सध्या दिलीप साहब यांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत असून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. अनेकदा ते हॉलपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा रूममध्ये जातात. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा. आमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आम्ही देवाचे आभार मानतो.
गेल्या अनेक वर्षांपासून सायरा बानो या दिलीप कुमार यांची निष्ठेने देखभाल करत आहेत. याविषयी त्यांनी सांगितले, ‘लोकांकडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळावेत यासाठी नाही, तर दिलीप साहब यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी मी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मी माझ्या कौतुकाची अपेक्षा करत नाही. त्यांना स्पर्श करायला मिळणे हीच माझ्यासाठी सर्वांत आनंदाची गोष्टी आहे.’ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून 97 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या आरोग्यासाठी योग्य ती सर्व काळजी घेतली जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
सौजन्य- सामना