आंतरराष्ट्रीय टेनिसचं चालतं बोलतं विद्यापीठ अशी पदवी मिळालेल्या रॉजर फेडरर या टेनिसपटूच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. रॉजर फेडररने नवीन वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतून म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांनी पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे. 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम नावावर असलेल्या रॉजरने 6 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरलं आहे. पण, मागील वर्षभरापासून 39 वर्षीय फेडरर गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दुखऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. 6 महिने आराम आणि कोविडमुळे फेडरर स्पर्धात्मक टेनिसपासून दूर होता.
त्यानंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदान झाले आणि त्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हा पासून फेडरर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत होता. काही दिवसांपूर्वी सर्व परिस्थिती नीट असल्यास ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्याचं सूतोवाच फेडररने केलं होतं. तसंच विम्बल्डन आणि टोकिओ अलॉम्पिक खेळण्याची इच्छा फेडररने व्यक्त केली होती.
मात्र त्याच्या व्यवस्थापकाने आज फेडरर ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळण्यास अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियन ओपन आयोजकांनीही त्याबाबत सोशल मीडियावर पत्रक जारी केले आहे. यामुळे टेनिस तसेच फेडररच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
दर वर्षी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळविण्यात येते. मात्र कोरोनाचे सावट अद्याप संपलेले नसल्यामुळे ही स्पर्धा यंदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. जोकोविच, नदाल, थीम, सेरेना, हेलेप सारखे दिग्गज टेनिसपटूंनी स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.
सौजन्य- सामना