लॉकडाऊन सुरू झाल्याने परदेशात चित्रीकरणासाठी गेलेले बरेच मराठी कलाकार तिकडेच अडकून पडल्याच्या बातम्या आपण वाचल्याच आहेत. सध्या करोनामुळे काही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद आहेत. त्यातच करोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर तर ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शूटिंगसाठी गेलेले अनेक मराठी कलाकार लंडनमध्येच अडकले आहेत. त्यातच ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू तिथेच अडकली असल्याचे बोलले गेले होते, पण ती परदेशातून केव्हाच परतली असून सध्या पुण्यात असल्याचे तिच्याच कुटुंबीयांनी म्हटले आहे.
ती परदेशात अडकल्याचे वृत्तच तिच्या वडिलांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणतात, रिंकू तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली होती. पण महिन्यापूर्वीच ती भारतात परतलीये. सध्या ती पुण्यात आहे. रिंकूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छूमंतर’मध्ये प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळे हेदेखील आहेत.