टीम इंडियाच्या यशस्वी वाटचालीचे साक्षीदार असलेले हिंदुस्थानी संघ प्रशिक्षक आपल्या 36 वर्षांच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीचा लेखाजोखा आत्मचरित्रपर पुस्तकाद्वारे आपल्या चाहत्यांसमोर मांडणार आहेत. जगातील ज्या ज्या क्रिकेटपटूंनी आणि क्रिकेटबाहेरील व्यक्तींनी त्यांना कारकिर्दीतील यशासाठी मदतीचा हात दिला त्यांच्याबद्दल कृतज्ञता ते आपल्या आत्मचरित्राद्वारे व्यक्त करणार आहेत.येत्या उन्हाळ्यात हे पुस्तक प्रकाशित केले जाईल असे सांगितले जात आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री 36 वर्षांपूर्वी बडोद्याविरुद्ध रणजी लढत खेळताना देशातील क्रिकेटशौकिनांना ठाऊक झाले होते. शास्त्री यांनी तिलक राज या गोलंदाजाच्या षटकात 6 षटकार फाटकावून नवा विक्रम रचला होता. त्या आठवणीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेल्या कटु-गोड आठवणींचा ठेवा ते आपल्या आत्मचरित्राद्वारे क्रिकेटशौकिनांपुढे आणणार आहेत.
शास्त्री यांना या आत्मचरित्राच्या लेखनात जेष्ठ क्रीडा पत्रकार अयाज मेमन मदत करणार आहेत, तर पुस्तकातील चित्रे हार्पर कॉलिन्सचे चित्रकार शिव राव चितारणार आहेत. आपल्या यशस्वी कारकीर्दीच्या आठवणी पुस्तकबद्ध करण्याचा निर्धार हा आपल्यासाठी आनंददायी अनुभव ठरेल असा विश्वास यशस्वी क्रिकेटपटू ते राष्ट्रीय प्रशिक्षक पदापर्यंत मजल मारणारे हिंदुस्थानचे माजी अष्टपैलू क्रिकेटर रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.