कोरोना संसर्ग काळामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अक्षरशः एखाद्या लढवय्याप्रमाणे फ्रंट लाईनवर काम केले, आजही करीत आहेत! कोरोना काळाचा खास मार्मिकच्या वाचकांसाठी स्वतः टोपे यांनी घेतलेला हा धावता आढावा..
पुण्यात ९ मार्च रोजी कोविड ची पहिली केस आढळली. आणि त्यानंतर कोरोना काळ सुरू झाला! महाराष्ट्रातील या कोविड कालाकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर- महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी जरी आढळून आला असला तरी राज्य शासनाने खबरदारीचा उपाययोजना जानेवारी महिन्यापासूनच सुरू केल्या होत्या. साधारणत: १८ जानेवारीपासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर त्यांचा आरोग्य विषयक पाठपुरावा सुरू करण्यात आला. देशात कोरोनाचे रूग्ण आढळल्यानंतर राज्य शासन अधिक सतर्क झाले. याच दरम्यान विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय सुरू असताना ९ मार्चला महाराष्ट्रात पहिले कोरोनाबाधित रूग्ण आढळले. राज्यात एपिडेमिक अॅक्ट लागू करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी अधिवेशन लवकर संपविण्याचा निर्णय घेतला. रुग्णहिताच्या दृष्टीने या कायद्याचा प्रभावी वापर करण्यात आला. त्याबरोबर मॉल, चित्रपटगृहे, शाळा, कार्यालये बंद करण्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला.
पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरबरोबरच मुंबईतही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला. अगदी गेल्या किमान १०० वर्षांत मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल सेवा बंद झाली. त्यानंतर राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विविध निर्णय घेतले. रुग्णांची वाढती संख्या पाहता खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा शासनाने ताब्यात घेतल्या. मुंबईमध्ये १० ते १५ दिवसांच्या कालावधीत जम्बो कोविड सेंटर्स उभारली. मार्च, एप्रिल, मे या काळात राज्याने न भूतो न भविष्यति अशी परिस्थिती अनुभवली. दररोज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आम्ही सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होतो.
टप्प्याटप्प्याने चाचण्यांची व्यवस्था वाढविली. सुरुवातीला कोरोना चाचण्या करणार्या केवळ तीन प्रयोगशाळा (मुंबई, पुणे, नागपूर) येथे होत्या, त्यात वाढ झाली. आता ५०० हून अधिक प्रयोगशाळा राज्यात आहेत.
खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणीसाठी केंद्र शासनाने ४५०० रुपये दर निश्चित केला होता. गेल्या आठ महिन्यात महाराष्ट्राने त्यात सहा वेळा दरांमध्ये कपात करीत आता चाचणीसाठी ७०० रुपये दर निश्चित केला आहे.
कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली.
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.
उपचारासाठी उपाययोजना करतानाच नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोनाबाबत जाणीवजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
महाराष्ट्रातील कोविडकाळाचे तुम्ही अवलोकन कसे करता? देशाच्या आणि इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची `कामगिरी’ कशी राहिली आहे?
उत्तर- महाराष्ट्र हे देशातील अन्य राज्यांपेक्षा मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अन्य राज्यांबरोबर तुलना करणे योग्य होणार नाही. मुंबईसारखे देशाची आर्थिक राजधानी असलेले शहर. या शहराशी कायम कनेक्ट असलेले आंतरराष्ट्रीय व्यवसाय, व्यवहार यामुळे तुलनेने अन्य राज्यांपेक्षा आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्याही जास्तच. मुंबईपाठोपाठ पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरांचा झालेला औद्योगिक विकास. लोकसंख्येची घनता या बाबी पाहिल्या तर अन्य राज्यांची आणि आपली परिस्थिती खूपच वेगळी आहे. केरळ राज्याच्या लोकसंख्येइतकी लोकसंख्या एकट्या मुंबई शहराची आहे.
महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या आकडेवारीत पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही लपवाछपवी केलेली नाही. त्यामुळे अन्य राज्यांच्य तुलनेत आपला मृत्यूदर देशात जास्त वाटतो. पण तोही आता कमी झाला आहे. जुन-जुलैमध्ये ४.५ असणारा आपल्या राज्याचा मृत्यूदर आता २.५ वर आला आहे. तो शून्यावर आणायचा आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९४ टक्के आहे.
महाराष्ट्राने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे अजून तरी राज्यात आपण दुसर्या लाटेला येऊ दिले नाही. एकीकडे दिल्ली, राजस्थान आणि पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी आपल्याकडे अजून तरी दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे.
महाराष्ट्राचे एसडब्ल्यूओटी एनालिसीस करायचे झाल्यास ते कसे असेल? लॉक – अनलॉक प्रक्रियेबाबत तुम्ही समाधानी आहात?
उत्तर- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे होते. महाराष्ट्राने मार्च महिन्याच्या दुसर्या- तिसर्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन केले. अचानकपणे लॉकडाऊनचा निर्णय नाही झाला. याकाळातही भाजीपाला, किराणा, दूध, औषधे यांची दुकाने सुरू करण्यास परवानगी होती. त्यामुळे कुठेही नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवला नाही.
नागरिकांचा अनावश्यक प्रवास थांबवला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत झाली. लॉकडाऊन करताना स्थानिक गरजांचा विचार देखील झाला. त्यामुळे लॉकडाऊन सुसह्य झाले. याकाळात ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला. जसे लॉकडाऊन केलं तसं हळूहळू एकएक करीत अनलॉक देखील करण्यात आले.
आता राज्यात बहुतांश व्यवहार पूर्ववत झाले आहेत. शाळा-कॉलेज सध्या बंद असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना या काळात अनेक नव्या गोष्टींना सामोरे जावे लागले.
आता महाराष्ट्रात लसीकरण कार्यक्रम कसा हवा?
उत्तर- महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील कोरोनाच्या लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला असून पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. दुसर्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश असून त्यामध्ये राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचार्यांसह आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवकांचा आणि महानगरपालिका कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसर्या गटात ५० वर्षावरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षाखालील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यादृष्टीने राज्यभर कोल्ड चेन उभी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राकडून त्यासाठीचे एसएमएस टप्प्याटप्प्याने येतील. त्यानुसार संबंधितांना लस देण्याचे काम पूर्ण होईल.
केंद्र सरकारने यासाठी को-विन हे अॅप तयार केले आहे. सर्व राज्यांकडून त्यासाठीची माहिती मागविली आहे. येऊ घातलेली लस कशा पद्धतीने द्यायची, त्याची तयारी, आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मतदान केंद्र रचनेप्रमाणे बूथ तयार करून व्हॅक्सिनेशन केले जाईल.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि कोविड योद्धा यांच्या विषयी काय निरीक्षणे नोंदवाल?
उत्तर- सध्या जगभर सुरू असलेल्या करोना साथीमुळे सार्वजनिक आरोग्य हा विषय ऐरणीवर आणला आहे. सुदृढ आरोग्य व्यवस्था उभी करण्यात असणा-या त्रुटी या साथीने आपल्याला दाखवून दिल्या आहेत. करोनानंतरचा महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्याचे महत्व ओळखून भविष्यकालीन नियोजन करेल, आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या पुरेसा हिस्सा आपण आरोग्याला देऊ आणि सर्वांसाठी आरोग्य हा हेतू साध्य करण्यासाठी युनिव्हर्सल हेल्थकेअरचा आधार घेऊ. याकरिता आपल्याला राज्य पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणात सक्षम आरोग्यव्यवस्थेचे जाळे विणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. करोनासारखे साथीचे आजार जेव्हा पसरतात, तेव्हा आपल्याला पुण्याचे नायडू संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय किंवा मुंबईचे कस्तुरबा संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय यांची नावे वारंवार ऐकायला मिळतात. ही दोन्ही रुग्णालये ब्रिटिशकाळात उभारण्यात आलेली आहेत तथापि स्वतंत्र भारतामध्ये साथीच्या आजारांसाठी अशी वेगळी रुग्णालये आपण उभी केली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यांच्या ठिकाणी संसर्गजन्य आजाराचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करीत आहोत. त्याचबरोबर अशा आजारांच्या उपाययोजनांकरीता कर्मचार्यांना प्रशिक्षण देणंदेखील काळाची गरज आहे.
करोनायोद्ध्यांच्या कार्याला मी सलाम करतो. गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस सर्वच जण अक्षरश: जिवाची बाजी लावून मानवतेच्या रक्षणाचं काम करीत आहेत.
लाखो रुग्णांना डोळ्यांना न दिसणार्या अज्ञात करोनाच्या हल्ल्यातून सहीसलामत बाहेर काढण्याच काम डॉक्टर्स आणि त्यांच्या मेडिकल स्टाफने केलेल आहे. अनेक ठिकाणी करोनायोद्ध्यांचा देवदूत म्हणून सन्मान केला जात आहे.
लॉकडाऊनकाळात सर्व उद्योग व्यवसाय, शाळा यांच्यासोबत धार्मिक स्थळेही बंद करावी लागली. त्यावेळेस या धार्मिकस्थळातील देव कुठे होता तर या डॉक्टर्स, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्यात तो असल्याची जाणीव झाली. डॉक्टर्स डे ला तर मी राज्यातील तमाम डॉक्टर्सना पत्रे लिहून त्यांचे आभार मानले होते. तसा डॉक्टरांचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्यात हवा असतो. करोना संकटाच्या विळख्यातून नागरिकांना सोडविण्यासाठी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे हजारो रूग्ण बरे होऊन घरी जातायत म्हणूनच त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
कोविडने काय गमाविले आणि काय दिले?
उत्तर- करोनामुळे अनेक आप्तांना आपल्यातून अकाली नेलं. राज्याच्या अर्थव्यवस्थेला काहीशी खीळ बसली. रोजच्या जगण्यातला मुक्त संचार आणि वावर हिरावून घेतला. माणूस माणसाकडे संशयाने पाहू लागला. लांब राहू लागला. स्पर्श ही मानवाची गरज आहे. तोच करोनाने हिसकावून घेतला. अनेक ठिकाणी आपल्या कुटुंबातील सदस्याला अखेरचा निरोप देणं देखील शक्य झाले नाहाr आणि त्यांना डोळे भरून शेवटचे पाहताही आले नाही. असे अनेक कटू अनुभव करोनाने मानवाला दिले आहेत.
मात्र याच करोनाने जीवनाकडे सकारात्मकतेने पहायला शिकवले. जीवनशैली आरोग्यदायी असण्याचा संदेश दिला. आपल्या आरोग्याला लागलेली बेशिस्तीची सवय बदलायला करोनाने भाग पाडलं.
महाराष्ट्रवासियांना `कोविड संदेश’ …!
उत्तर- कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी त्याचा शेवट अद्यापही झालेला नाही, ही गोष्ट प्रत्येकाने मनात बिंबवली पाहिजे. दैनंदिन आयुष्य जगताना कोरोनाच्या बाबतीत बेफिकीरी करून चालणार नाही. त्यामुळे मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर या बाबींचे पालन करणे गरजेचे आहे. लस येईल तोपर्यंत या सवयी प्रत्येकाने अंगीकारणं गरजेचं आहे.
आपण ही लढाई नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला साथ दिली आहे. या पुढील काळातही अशीच साथ मिळेल असाही विश्वास आहे!
मुलाखत : आशिष पेंडसे
कोरोनाकाळातील महत्वाच्या बाबी
- रूग्णांच्या हिताचे रक्षण
- खाजगी रुग्णालयांनी सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट करू नये म्हणून या बिलांचे शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्याच्या यंत्रणेला सूचना.
- वैद्यकीय बिलांबाबत काही तक्रारी असल्यास त्या निवारण करण्याकरिता जिल्हा आणि राज्य स्तरावर यंत्रणा कार्यरत.
- खाजगी प्रयोगशाळांच्या तसेच सी टी स्कॅनच्या फीवर निर्बंध.
- शासकीय रुग्णालयात रेमडिसिव्हिर हे इंजेक्शन मोफत उपलब्ध.
- खाजगी रुग्णालयात रेमडिसिव्हिर इंजेक्शनची किंमत रु. २३६० रुपयांपर्यंत कमी.
- खाजगी प्रयोगशाळांमधील कोरोना निदान चाचणी शुल्क ४५००पासून ७०० रुपयांपर्यंत कमी.
- मास्कच्या किमतीवरही नियंत्रण.
- अतिदक्षता विभागात उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचारासाठी मुंबई, ठाणे, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, अकोला आणि जालना या सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘टेलिआयसीयू’ सुविधेचा वापर.
- ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा प्रत्येक रुग्णालयांना गरजेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा व्हावा, याकरिता ऑक्सिजन वितरण आणि पुरवठा यंत्रणेवर प्रभावी सनियंत्रण व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने राज्यात जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर नियंत्रण समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी
फलनिष्पत्ती
- पहिल्या टप्प्यामध्ये ९९ टक्के म्हणजे २.७६ कोटी घरापैंकी २.७४ कोटी घरांमधील तसेच १२.४३ कोटी पैकी ११.९२ कोटी व्यक्तींशी थेट संपक.
- दुस-या टप्प्यामध्ये ९८ टक्के म्हणजे २.७० कोटी घरे तसेच १०.०१ कोटी (८१ टक्के) व्यक्तींशी थेट संपक.
- प्रशिक्षित टीमव्दारे भेट दिलेल्या प्रत्येक व्यक्तीची ताप, ऑक्सीजन पातळी तपासणी आणि आरोग्य शिक्षण.
- सर्वेक्षण काळात आढळून आलेल्या सुमारे ३.५७ लाख घ्थ्घ् / एARघ् रुग्णांपैकी सुमारे ३.२२ लाख रुग्णांची कोवीडसाठी तपासणी करण्यात आली. कोवीड-१९ संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या ५१ हजार रुग्णांना वेळीच उपचार.
- सर्वेक्षण काळात घरोघर भेटीमध्ये मधुमेह -८.७० लाख, उच्चरक्त दाब- १३ लाख, हृदयविकार – ७३ हजार, कर्करोग – १७ हजार आणि इतर आजाराचे १ लाख असे एकूण सुमारे २४ लाख कोमॉर्बीड रुग्ण आढळले. त्यांना आवश्यकतेनुसार पुढील उपचाराची सोय करण्यात आली.