ऐन हिवाळ्यात मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचं आगमन झालं आहे. शुक्रवारी मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पावसाचा शिडकावा झाला.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंड, सायन, भांडुप परिसरात तसेच डोंबिवलीतही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तसेच पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडल्या.
काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे वातावरणात उष्मा जाणवत होता. कडाक्याच्या थंडीचा जोर कमी होऊन गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही परिसरात ढगाळ हवामान होते.
मुंबईसह कोकण, नाशिक, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष बागांसह कांदा, रब्बी पिके संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोकणात सतत गेले चार दिवस पावसाच्या अधूनमधून सरी बरसत असून या पावसामुळे थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. तसेच या पावसामुळे कोकणातील आंबा, काजू, कोकम पिके धोक्यात आली आहेत.