कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ससून रुग्णालयातील एक नर्स आणि येथील कार्यालयात काम करणारा एक कर्मचारी असे दोघेजण पॉझिटिव्ह आले आहेत. लस घेतल्यानंतर एकजण चौथ्या दिवशी, तर दुसरा सात दिवसांनी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
ससून रुग्णालयामध्ये सध्या पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू असून, या आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘कोविशिल्ड’ ही लस देण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस दिल्यानंतर येथील दोन आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर लगेच लसीची परिणामकारकता दिसून येत नाही. तर, दुसरा बुस्टर डोस घेतल्यानंतर किमान 14 दिवसांनंतर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. लसीचे सकारात्मक परिणाम दिसून येण्यास सुरुवात होते. त्यामुळे लस घेतल्यानंतरही धोका असल्याने लसीकरणानंतरही सर्वांनी फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
लस दिल्यानंतर रुग्णालयातील दोघेजण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून, सध्या ते स्थिर अवस्थेत आहेत. लसीमुळे त्यांना हा संसर्ग झाला नाही. नेहमीप्रमाणे ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. लसीकरणानंतरही आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
डॉ. मुरलीधर तांबे, अधिष्ठाता, ससून रुग्णालय