मुंबई ३ जुलै २०२३ – प्रो-कबड्डी लीगच्या दहाव्या पर्वाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. लीगचे प्रवर्तक मशाल स्पोर्ट्सने येत्या ८ ते ९ सप्टेंबर दरम्यान लीगच्या दहाव्या पर्वासाठी मुंबईत लिलाव होणार असल्याचे जाहीर केले आहे. यंदाच्या लिलावाचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे या वेळी खेळाडूंच्या विक्रीसाठी फ्रँचाईजी मालकांची खर्चाची मर्यादा ४.४ कोटीवरून ५ कोटी इतकी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशांतर्गत आणि परदेशी खेळाडूंची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये अ, ब, क, ड अशा चार श्रेणी असून, त्यामध्ये अष्टपैलू, बचावपटू, चढाईपटू असे गट करण्यात आले आहेत. अ श्रेणीसाठी ३० लाख, ब श्रेणीसाठी २० लाख, क श्रेणीसाठी १३ लाख आणि डी श्रेणीसाठी ९ लाख अशी मुलभूत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेतील अंतिम दोन संघातील २४ खेळाडूंचा लिलावात समावेश करण्यात येणार आहे.
मशाल स्पोर्टसचे लीग प्रमुख अनुपण गोस्वामी म्हणाले, लीगचे दहावे पर्व हा एक महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे लिलावापासून या दहाव्या पर्वाचे आकर्षण राहिल. सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी आमचे १२ फ्रँचाईजी मालक सज्ज राहातील. लीगच्या धोरणांनुसार फ्रँचाईजी मालकाना नवव्या लीगमधील खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार असेल. यामध्ये नियमानुसार सहा खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल. जे खेळाडू कायम केले जाणार नाहीत, ते खेळाडू या वर्षीच्या ५०० खेळाडूंच्याबरोबरीने लिलाव प्रक्रियेत सहभागी होतील.
मशाल स्पोर्ट्स आणि डिस्ने स्टारने या लीगला भारतीय कबड्डी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली सर्वात यशस्वी लीग ठरवले आहे. भारतात होणाऱ्या विविध खेळ लीगच्या तुलनेत प्रो-कबड्डी लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळले जातात. लीगमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंची प्रतिमा बदलली आहे. लीगमधील खेळाडूंचा सहभाग बघितल्यावर अनेक देशांनी आपला देशांतर्गत कबड्डी स्पर्धा घेण्यास सुरुवात केली आहे.