चित्रपटांपाठोपाठ अभिनेत्री प्रिया मराठे हिने वेबसिरीजमध्येही काम केले. ‘कसक’ या हीट वेबसिरीजमध्ये वकिलाची भूमिका केल्यावर प्रिया आता एका नाटकातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या नव्या नाटकाच्या तालमी आता सुरू झाल्या आहेत. या नाटकातील कलाकारांच्या टीमसोबतचा फोटो प्रियाने नुकताच इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. यात शरद पोंक्षे, अतुल परचुरे, राजन भिले, स्वाती चिटणीस, शशांक केतकर, क्षितीज दाते, श्वेता पेंडसे वगैरे दिसत आहेत. हे सगळेच जण हसत आहेत. त्यावरून ही रिहर्सल जोमात सुरू असून प्रत्येकजण आपापल्या भूमिकेवर खूश असल्याचे स्पष्ट आहे. मराठी रंगभूमी हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच अनेक नाटके सुरू व्हायच्या तयारीत आहेत. ‘हॅलो इन्स्पेक्टर’ त्यातलेच एक म्हणता येईल. या पोस्टमधील कॅप्शनमध्ये प्रिया म्हणतेय, ‘स्टील वर्क इन प्रोग्रेस…’ त्यामुळे नाटकाच्या तालमी पूर्ण होऊन पहिला प्रयोग कधी लागतो त्याची वाट आपण पाहिलीच पाहिजे. एकदा सगळं पूर्ववत सुरू झालं की नाटके पाहायची मजा घ्यायचीच आहे. पहिल्या प्रयोगाबाबतही प्रिया अपडेट देईलच.