आयुष्यातील प्रत्येक लढाई निर्धाराने लढण्यातच खरी मजा असते, हाच खरा प्रवास असतो हा विचार नकळतपणे देणारा ‘प्रवास’ हा मराठी सिनेमा यंदाच्या 51व्या इफ्फी चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरामा या विभागात दाखवला जाणार आहे. ‘द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) होणाऱ्या चित्रपटांची निवड हा नेहमीच चित्रपटकर्मीसाठी औत्सुक्याचा विषय असतो.
शशांक उदापूरकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘प्रवास’ची निवड ‘इफ्फी’ या मानाच्या महोत्सवात होणे ही आमच्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याचे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर म्हणाले. आनंददायी प्रवासाची गोष्ट सांगत आयुष्याचे मर्म सांगणारा असल्याने या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.