‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांमुळे अभिनेता प्रभास बॉलीवूडमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे यात वाद नाही. त्याला ‘बाहुबली’ याच नावाने ओळखले जाऊ लागले आहे. साऊथच्या सिनेइंडस्ट्रीत तो सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वाधिक बिझी अभिनेता आहेच, पण बॉलीवूडमध्येही तो बडा स्टार मानला जाऊ लागला आहे. त्याच्याकडे काही बड्या बजेटचे बॉलीवूडपटही आहेत. या सगळ्यावर मिळून त्याच्यावर तब्बल १ हजार कोटींच्यावर रुपये लागले आहेत.
प्रभासकडे असलेल्या चित्रपटांमध्ये ‘आदिपुरुष’, ‘राधे श्याम’ आणि नागा अश्विन यांचा एक सायन्स फिक्शन चित्रपट असे मिळून तीन चित्रपट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या तीन चित्रपटांवर निर्मात्यांनी एक हजारहून जास्त रुपयांची गुंतवणूक केली आहे. होय मंडळी, म्हणजे एकट्या प्रभासवर एवढी मोठी रक्कम लागली आहे.
‘राधे श्याम’ चित्रपटात तो अभिनेत्री पूजा हेगडेसोबत दिसणार आहेत. हा एक पिरीयड ड्रामा आणि रोमान्स चित्रपट आहे. या सिनेमाचे बजेट २५० कोटींचे आहे. अलीकडेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले, तेव्हा प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार करत आहेत.
प्रभासकडील आणखी एक बडा प्रोजेक्ट म्हणजे ‘आदिपुरुष’… हा चित्रपट ओम राऊत हे मराठी दिग्दर्शक बनवत आहेत. रामायणावर आधारलेल्या या चित्रपटात प्रभास राम बनलाय, तर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतोय. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे बजेट ४५० कोटी असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबतही प्रभास एक सिनेमा करतोय. नागा अश्विन यांचे दिग्दर्शन असलेल्या या सायन्स फिक्शन सिनेमाचे अजून नाव ठरलेले नाही. पण प्रभासच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाचेही मोठे आकर्षण आहे असे दिसतेय. या सिनेमावर निर्मात्यांनी ३०० कोटी रुपये गुंतवले आहेत. हा सिनेमा तेलुगू असून दीपिका पदुकोण या सिनेमाद्वारे तेलुगू चित्रपटांमध्ये पाऊल ठेवतेय.
या तीन बड्या बॅनरच्या चित्रपटांखेरीज प्रभास सध्या तेलुगू निर्माते कोरतला शिवा यांच्याशीही त्यांच्या नव्या चित्रपटाबाबत बातचीत करतोय असे वृत्त काहीच दिवसांपूर्वी आले होते. हे दोघेजणही एक नवा प्रोजेक्ट एकत्र करणार आहेत असे कळते. पण तो सुरू व्हायला किमान दोन वर्षे तरी लागतील. त्याआधी प्रभास आणि निर्माते शिवा यांनी ‘मिर्ची’ या तेलुगू अॅक्शनपटात एकत्र काम केले होते.
प्रभास सध्या ‘राधे श्याम’ या आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात तो विक्रमादित्य नावाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे, तर पूजा हेगडे यात एक म्युझिक टीचर म्हणून प्रेक्षकांसमोर येईल. प्रभासचा हा सिनेमा हिंदी, तमीळ आणि मल्याळी भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.