शिवाजीनगर मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस शिपायाला अखेर खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. ही घटना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात 20 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास घडली होती. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी बडतर्फीचे आदेश दिले आहेत.
मयूर ज्ञानेश्वर सस्ते (सी. कंपनी, शिवाजीनगर मुख्यालय) असे बडतर्फ करण्यात आलेल्या बिगूरलचे नाव आहे.
मयूर सस्ते बिगूलर म्हणून पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. 20 ऑक्टोबरला मध्यरात्री मुख्यालयातील क्वार्टर गार्ड विभागात तो ड्युटीवर होता. त्यावेळी त्याने महिला शिपायाला डोळा लागल्याची संधी साधून विनयभंग केला. महिलेला जाग आल्यामुळे तिने गोंधळ घातला.
याप्रकरणी महिला तक्रार करण्याच्या भीतीने सस्ते याने क्वार्टर गार्ड खोलीतून बंदूक घेत स्वतःवर गोळी झाडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गार्ड अमंदलार दत्तात्रय बेंढारी यांनी सस्तेकडून बंदूक काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सस्तेने ट्रीगर दाबल्याने गोळी उडून बेंढारी यांच्या हाताला लागल्यामुळे ते जखमी झाले होते. याप्रकरणी सस्तेला अटक करण्यात आली होती.
पोलीस खात्याला अशोभनीय वर्तनाचा ठपका
खात्यातंर्गत चौकशीत मयूर सस्ते दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्याने महिला कर्मचाऱ्यास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. त्याशिवाय शासकीय शस्त्राचा अनधिकृतपणे वापर करून शिस्तीला बाधा आणणारे कृत्य केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. सस्तेचे वर्तन पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचे नमूद करीत अपर पोलीस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांनी त्याला खात्यातून बडतर्फ करण्याचे आदेश दिले.
सौजन्य : दैनिक सामना