पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत महाघोटाळा झाला आहे. या योजनेतील 1364 कोटी रुपये हे 20 लाख 48 हजार बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत महाघोटाळा झाला आहे. या योजनेतील 1364 कोटी रुपये हे 20 लाख 48 हजार बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्स इनिशिएटिव्हचे वेंकटेश नायक यांच्या हवाल्यातून एका हिंदी दैनिकाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. नायक यांना केंद्रीय कृषि मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या योजनेचे पैसे ज्या बोगस लाभार्थ्यांना मिळाले आहेत त्यात दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग हा योजनेच्या निकषात न बसणाऱ्य़ा शेतकऱ्य़ांचा आहे. असे 44.41 टक्के शेतकरी आहेत. दुसऱ्य़ा वर्गात आयकर भरणारे शेतकरी आहेत. त्यांचे प्रमाण 55.58 टक्के आहे असे या वृत्तात नमूद आहे.
पंतप्रधान किसान सन्मान योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत कमी जमीन असलेल्या शेतकऱ्य़ांना वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किसान कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये नोंदणी करावी लागते. याशिवाय महसूल अधिकारी आणि या योजनेसाठी राज्य सरकारने नेमलेले अधिकारीच नोंदणी करू शकतात. आतापर्यंत या योजनेचा फायदा देशातील 11 कोटी शेतकऱ्य़ांना मिळाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पैसा मिळालेले बोगस लाभार्थी हे पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील आहेत. सर्वाधिक हे पंजाबमधील असून त्यांची संख्या 23.6 टक्के म्हणजेच 4 लाख 74 हजार इतकी आहे. त्यानंतर आसाम (3 लाख 45 हजार) आणि महाराष्ट्र (2 लाख 86 हजार) या राज्यांचा क्रमांक लागतो. गुजरातमधील आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 1 लाख 64 हजार बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली आहे.