कोविडशी दोन हात करताना एखाद्या कोविड योद्धय़ाचा मृत्यू झाला तर त्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 50 लाखांची भरपाई दिली जाते. मात्र या योजनेचा लाभ 55 वर्षांखालील कोविड योद्धय़ांपुरताच मर्यादित आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणाऱया किरण सुरगडे यांचे पती डॉ. भास्कर सुरगडे यांचा कोविडची लागण झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत 50 लाखांची भरपाई मिळावी यासाठी किरण यांनी न्यू इंडिया अॅन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला.
मात्र कंपनीने नकार दिल्याने सुरगडे यांनी हायकोर्टात अॅड. अजित करवंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी केंद्र सरकारच्या वतीने अॅड. संदेश सावंत यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, याचिकाकर्त्याना भरपाई देता येणार नाही. त्यांचे वय हे 56 वर्ष होते. याशिवाय ते आपल्या खाजगी आयुर्वेदिक दवाखान्यात रुग्णांना उपचार देत होते. त्यांच्या मृत्यूबाबत कोणत्याही कोविड रुग्णालयातून विमा संदर्भात अर्ज आलेला नाही. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत कंपनीने या योजने अंतर्गत आतापर्यंत किती लोकांना विमा दिला त्याबाबत माहिती देण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले व सुनावणी 13 जानेवारीपर्यंत तहकूब केली.