कलर्स या हिंदी मनोरंजन वाहिनीवरील ‘पिंजरा खूबसूरती का’ या मालिकेत लवकरच अभिनेता अभिषेक मलिक याची एण्ट्री होणार आहे. ही मालिका आता खूप रोमांचक स्थितीत आली आहे. मयुराला (श्रुती शर्मा) आपल्या जीवनात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. ओंकारही (साहिल उप्पल) सौंदर्याच्या त्याच्या वेडापायी व मयुराविषयीच्या त्याच्या दृष्टीकोनाबाबत खूप पुढे आला आहे. सध्याच्या ट्रॅक मध्ये ओंकारला मयुरा जिवंत असल्याची बातमी कळते पण ती मयुरा नसल्याचे पाहून तो निराश होतो.
वास्तवात मयुरा तिच्या कुटुंबासोबत भोपाळमध्ये आहे आणि तिला ओंकार आठवत नाहीये. यातच भर घालण्यासाठी अभिनेता अभिषेक मलिक एका उच्चशिक्षित फॉरेन रिटर्न्ड डॉक्टरची भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय. याविषयी बोलताना अभिषेक म्हणाला, या मालिकेत ही भूमिका वर्षाच्या प्रारंभीच मिळाल्याने खूपच आनंद झाला आहे. या मालिकेचे शूटिंगही मी सुरू केले आहे. या मालिकेत मी डॉ. नील उपाध्यायची भूमिका करतोय. हा एक एनआरआय आहे. तो अतिशय आत्मविश्वासी आहे. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडेल, असेही त्याने स्पष्ट केले.