‘पिंजरा खूबसुरती का’ या कलर्स हिंदी मनोरंजन वाहिनीवरील मालिकेतही ख्रिसमस सेलिब्रेशन दाखवण्यात येतंय. यात ओंकार (साहिल उप्पल) आणि मयुरा (रिया शर्मा) यांच्या कथेद्वारे सौंदर्य कसे एखाद्यासाठी सापळा बनते ते दाखवले आहे. मालिकेच्या सध्या चालू असलेल्या ट्रॅकमध्ये ओंकारचे लग्न ऐश्वर्या भारद्वाजशी (निधी भावसार) होणार असते. या प्रक्रियेत ऐश्वर्या मयुराला ट्रॅप करण्यात यशस्वी होते आणि अतिशय आत्मविश्वासाने ओंकारसमोर ती कशी चुकीची आहे हे सिद्ध करण्यात यशस्वी होते. त्यानंतर ओंकार एक ख्रिसमस पार्टी आयोजित करतो, ज्यात एका नाट्यमय कलाटणीमध्ये ऐश्वर्याने त्याच्यासाठी रचलेल्या भयावह सापळ्यापासून मयुरा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे.
या सेलिब्रेशनबाबत बोलताना साहिल उप्पल म्हणाला, ख्रिसमस पार्टीच्या या ट्रॅकविषयी मी उत्सुक आहे. मालिकेमध्ये भरपूर कलाटण्या पाहायला मिळत आहेत. यातच ओंकार आणि मयुराचे नाते एका नव्या पातळीवर जाऊन पोहोचते. मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि माझ्या पूर्ण क्षमतेनुसार माझे पात्र साकारण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असेही तो म्हणतो.