मराठी सिनेसृष्टीत वितरण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावल्यानंतर संगीत क्षेत्रात योगदान देण्याच्या उद्देशानं पिकल एन्टरटेन्मेंटच्या समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांनी सुरू केलेल्या ‘पिकल म्युझिक’नं अल्पावधतीच संगीतप्रेमींच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. पहिल्या गाण्यापासूनच पिकलनं रसिकांची आवड जोपासत म्युझिक व्हिडीओंची प्रस्तुती केली आहे. संगीतप्रेमींचं मनोरंजन करण्याच्या या प्रवासात पिकलनं आणखी एक नवं पाऊल टाकत ‘प्यार की राहों में…’ या हिंदी गाण्याच्या माध्यमातून आपला नवा प्रवास सुरू केला आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या पिकलच्या सर्वच गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेलं ‘प्यार की राहों में…’ या गाण्याचं उत्कंठावर्धक पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर गाणंही रसिकांच्या भेटीला आलं आहे. दिग्दर्शक कैलाश काशिनाथ पवार यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, संकलनही त्यांनीच केलं आहे. सुप्रसिद्ध गायिका साधना जेजुरीकर यांच्या आवाजातील हे हिंदी गाणं रसिकांना मंत्रमुग्ध करणारं आहे. रशीद यांनी या गाण्याचं लेखन केलं असून, राजा अली यांनी संगीत दिलं आहे. दीपिका बिस्वास आणि यश कदम या कलाकारांवर ‘प्यार की राहों में…’ चित्रीत करण्यात आलं आहे. अभिनेत्री दीपिका बिस्वासचे दोन हिंदी सिनेमे आणि वेब सिरीज प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. ‘प्यार की राहों में…’मध्ये दीपिकाने सुंदर अभिनय आणि नृत्याचे दर्शन घडवले आहे. या गाण्यातील शब्दरचनेसोबतच संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातूनही प्रेमाची जणू बरसात करण्यात आल्याचं रसिकांना गाणं पाहताना जाणवेल असा विश्वास पिकल म्युझिकचे समीर दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.
साधना जेजुरीकर यांच्या सुमधूर आवाजातील हे गाणं खऱ्या अर्थानं रसिकांवर मोहिनी घालणारं ठरणार आहे. साधना यांनी आजवर मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेतील गाणीही गायली आहेत. बॅचलर ऑफ म्युझिकमध्ये गोल्ड मेडलीस्ट असणाऱ्या साधना यांनी उज्जैनमधील पं. रमाकांत दुबे व मोहन सिंग भागवत यांच्याकडून हिंदुस्थानी क्लासिकल, संगीतकार कुलदीप सिंग यांच्याकडून व्हॅाईस मॅाड्युलेशन, तर पं. ओम प्रकाश शर्मा यांच्याकडून १५ वर्षे गझल गायकीचं प्रशिक्षण घेतलं आहे. आजवर त्यांनी बरेच चित्रपट आणि वेगवेगळ्या भाषांमधील म्युझिक अल्बमसाठी गायन केलं आहे. त्यामुळं साधना यांनी गायलेलं ‘प्यार की राहों में…’ हे गाणंही रसिकांच्या मनाचा ठाव घेणारं ठरणार यात शंका नाही. डिओपी सुनील गुरव यांनी या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, अनिकेत गायकवाड व रोहित कदम यांनी कोरिओग्राफी केली आहे.