पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ अजूनही थांबलेली नाही. सरकारी कंपन्यांनी पेट्रोलचे भाव 28 पैशांनी आणि डिझेलचे 30 पैशांनी वाढवल्याने देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईसह देशात पेट्रोलचे भाव नव्वदी तर डिझेलचे दर ऐंशीपार गेले आहेत.
देशात यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताच बदल झाला नव्हता. ऑगस्टमध्ये पेट्रोल आणि त्याआधी जुलैमध्ये डिझेलच्या दरात वाढ झाली होती. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 50 डॉलर प्रति बॅरल झाले होते, मात्र गेल्या महिन्यात कच्च्या तेलाचे दर वाढले होते.
महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मुंबईत पेट्रोलचे भाव 27 पैशांनी वाढले. त्यामुळे पेट्रोलचे भाव वाढून 90.05 रुपये प्रति लिटर झाले, तर डिझेलचे भाव 30 पैशांनी वाढल्याने डिझेलचे दर 80.23 रुपये प्रति लिटर झाले आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचे पंबरडे मोडले आहे.
40 रुपये लिटरनेच विकायला हवे
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचलेत. देशातील सर्वसामान्य नागरिक इंधन दरवाढीवरून रोष व्यक्त करू लागलेत. याच मुद्दय़ावरून भाजप नेते व राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त करत पेट्रोल 40 रुपये लिटरनेच विकायला हवे, असे स्पष्ट मत मांडले आहे.
भाजप नेते स्वामी यांनी ट्विट करत इंधन दरवाढीबाबत मत व्यक्त केले आहे. देशात पेट्रोलचे दर 90 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. ही देशातील सर्वसामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोलच्या किमतीचे गणित समजावून सांगत त्यांनी दर खाली आणण्याची सूचना केली आहे. पेट्रोलची एक्स रिफायनरी मूळ पिंमत 30 रुपये प्रतिलिटर एवढी आहे. सर्व प्रकारचे टॅक्स आणि पेट्रोल पंपाचे कमिशन मिळून ही किंमत 60 रुपयांनी वाढते. त्यामुळे पेट्रोलचे प्रतिलिटर दर 90 रुपये एवढे आहेत.
राज्यातील इंधन दर (प्रति लिटर)
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई 90.05 80.23
ठाणे 90.39 80.56
पुणे 90.00 78.97
नाशिक 90.76 79.71
नागपूर 90.18 79.78
सौजन्य- सामना