दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईचा विवाह सोहळा थाटात संपन्न होत असून मंगळवारी दुपारी 12 वाजता अक्षता पडणार आहेत. या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.
वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. आणि याच मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा साजरा होत असतो.
या आगळ्या वेगळ्या विवाहाची सकाळपासून सुरू होणारी धामधूम पंढरपुरकर व लाखो भाविकांना घरीच बसून पाहावी लागणार आहे. यंदाचा विवाह सोहळा खास असून या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती , विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहणार आहेत. ही संकल्पना पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे मूर्तरूपात आणि फुलांच्या सजावटीमधून साकारणार आहेत.
यंदा वधू-वर अर्थात विठुराया व रुक्मिणी मातेचा विवाहाचा पेहराव बंगळुरू येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे. वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे.
रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची रेशमी कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे.
अजूनही राज्यात कोरोनाचे संकट संपले नसल्याने या विवाहसोहळ्यासाठी दरवर्षी प्रमाणे राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना देवाच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नसून त्यांना घरी बसूनच टीव्हीवर या आनंदात सहभागी व्हावे लागणार आहे. विवाहाची सध्या मंदिरात जोरदार लगबग सुरू असून भाविक जरी येणार नसले तरी हा विवाह सोहळा दरवर्षी प्रमाणेच शाही पद्धतीने साजरा केला जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.