राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धडधडती तोफ अशी ओळख असलेले आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र यावर पक्षाचे नेते योग्य निर्णय घेतील आणि लोकांना योग्य न्याय दिला जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार नाशिक दौऱयावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना पार्थ पवार यांची उमेदवारी, एकनाथ खडसे यांची ईडीची चौकशी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही भाष्य केले. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेबद्दल पत्रकारांनी विचारले असता रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. कार्यकर्ते बोलून जातात. पण नेते निर्णय घेतात. परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. कोणी अशी मागणी केली म्हणून ती लगेच पूर्ण होईल असेही नाही, पण तेथील लोकांना योग्य न्याय दिला जाईल याचा मला विश्वास आहे असे रोहित पवार म्हणाले.
ईडीचा राजकीय वापर अयोग्य
भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीला सामोरे जातील. ईडीचा राजकीय वापर होत असेल तर ते अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
कोल्हापूरकर स्वागत करणार का
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी, मी कोल्हापूरला परत जाईन असे वक्तव्य केले होते, त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील कोल्हापूरला जातील, पण कोल्हापूरकर त्यांचे स्वागत करतात का ते बघू असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
सौजन्य- सामना