एक दिवस दादा म्हणाले, ‘‘तू कोकण्या ना? फार खवचट असतात कोकणी लोक. तसलं काही लिहीत का नाहीस?’’
मी त्यांना त्या वेळच्या शिवसेनेवर उठता बसता आगपाखड करणार्या नेत्यांवर खवचट लिहून त्यांना दाखवले. त्यांनी ते १०० टक्के मार्कांनी पास केले. तसे त्या लेखाच्या मार्जिनमध्ये लिहिले. श्रीकांतजींनी लेखक म्हणून टोच्या नाव दिले. सदर सुरू झाले. त्यानंतर द.पां. खांबेटे, दि.वि. गोखले यांच्या उपदेशानुसार युद्धकथा, हेरकथा लिहायला लागलो. त्या श्रीकांतजींना आवडायच्या.
मी पत्रकार कसा झालो हे फारसे कुणाला माहीत नाही. ज्या वयात म्हणजे बाल-कुमार-तारुण्य अवस्थेत माणूस मनोराज्ये करतो त्या वयातच काय, त्यानंतरही काही वर्षे पत्रकार होणे ही गोष्ट माझ्या मनोराज्यात नव्हती. लहानपणापासून एक वेड होते. मोठा चित्रकार होण्याचे़, विमानदलात फायटर पायलट होण्याचा विचारसुद्धा कधीतरी येऊन गेल्याचे आठवते. पण शिल्लक राहिले चित्रकार होणे. तेसुद्धा लवकर हातास लागले नाही. ट्रान्सफर रंगवणार्या कंपनीत हमाल, गणपतीच्या कारखान्यात ‘रेखणी’ करणारा अशी कामे करण्यात वर्षे गेली नि मग मला बेस्ट कंडक्टरची नोकरी लागली. या नोकरीत मला टिकीट हँड कॅशचे वडाळा डेपोतले प्रमुख जयवंतराव देशमुख गॉडफादर लाभले. म्हणून मला चित्रकारी आणि चित्रकला अशी दोन्ही प्रमाणपत्रे मिळवता आली. त्यांच्या आग्रहावरून ती बेस्ट सोडली आणि महापालिकेच्या शिक्षण विभागात ड्रॉइंग टीचर म्हणून नोकरी लागली.
दरम्यान, शिवसेना निघाली होती. मी संयुक्त महाराष्ट्र लढ्यामधला चळवळ्या असल्यामुळे साहजिकच शिवसेनेत दाखल झालो. एक दिवस देशमुख साहेबांचा मुलगा श्याम मला म्हणाला, ‘चला, ठाकर्यांकडे येता.’ नाही तरी मला अफलातून व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे प्रचंड आकर्षण होते. त्यांना जवळून पहाता येईल. झालेच तर दोन शब्द बोलता येतील अशा हिशेबाने मी होकार दिला. पण त्या क्षणी मला पुसटशीसुद्धा कल्पना नव्हती की माझ्या ललाटलेखातले पहिले अक्षर बदलण्याची वेळ आली आहे. आम्ही गेलो. त्या वेळी श्याम बाळासाहेबांच्या अगदी जवळचा सहकारी होता.
पण झाले असे की, बाळासाहेबांकडे लांबून बहुदा बेळगावहून माणसे आली होती. त्यांना किती वेळ लागेल सांगता येत नव्हते. मी बाहेरच्या हॉलमध्ये बसलो होतो. समोर प्रबोधनकार खाटेवर बसून टाइपरायटरवर काहीतरी टायपीत होते. भले उंच नि रुंद कपाळ समोरच्याच्या आरपार जाणारी नजर, गोरापान वर्ण. त्यांचे लक्ष त्यांच्या कामात होते. तेवढ्यात श्याम आतून बाहेर आला नि म्हणाला, बाळासाहेब लवकर मोकळे होतील, असे दिसत नाही. मी तुमची दादांशी ओळख करून देतो आणि त्याने प्रबोधनकारांना हाक मारली नि म्हटलं, दादा हा पंढरी सावंत. प्रचंड वाचन आहे. चित्रे काढतो. अक्षर छापील आहे. हे शेवटचे वाक्य ऐकताच दादांनी नजर वर केली आणि खणखणीत आवाजात विचारले, ‘‘माझ्याकडे येता काय?’’
माझ्या कवटीत हजारो व्होल्टचा प्रकाश चमकला. मी मागचापुढचा विचार न करता सरळ हो म्हणून गेलो. मग त्यांनी मला एक वर्तमानपत्र दिले आणि पॅरा वाचून दाखवायला सांगितला. तो पॅरा मी नाटकात बोलतात तशा आवाजात चढउतार करत सगळ्या विरामचिन्हांवर जमेल तेवढा विराम घेत वाचला आणि लगेच दादांचा पुढचा प्रश्न आला.
‘‘कधी येतोस?’’
‘‘राजीनामा देतो. एक-दोन दिवसांत पास करून घेतो नि येतो.’’ सोमवारी ये. अग्रलेख डिक्टेट करीन.’’ होकार देऊन निघालो.
वाटेत श्याम म्हणाला, ‘‘सावंत तुम्ही काय केलं कल्पना आहे? एक नोकरी सोडणार. दादांना तुम्ही नीट वाटला नाहीत तर सरळ हाकलून देणार. मोठी जोखीम घेतलीत. बघा बुवा, पण मी वैâफात होतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा नेता, महान समाजसुधारक, खरा पत्रकार लढवय्या, कधी हार न स्वीकारणारा. अशा माणसाच्या हाताखाली काम करायला मिळणार म्हणून मी ‘टाइट’ होऊन घरी आलो. सोमवारी सकाळी ९ वाजता हजर झालो. लगेच डिक्टेशनला सुरुवात. ते पूर्ण झाल्यावर त्यांना वाचून दाखवणे. अधेमधे एखादा शब्द काढणे नाहीतर घालणे.’’
एवढे झाल्यावर प्रबोधनकार म्हणाले, ‘‘उत्तम… आता असं कर… हे प्रभादेवीला नेऊन प्रेसमध्ये टाक आणि घरी जा. त्याप्रमाणे केले.’’
असा क्रम सुरू झाला. थोड्या दिवसांत बाळासाहेब वांद्र्याच्या घरी रहायला गेले. त्यांच्याबरोबर दादा होते. श्रीकांतजी दादरलाच राहिले. सकाळी १ नंबरची बस पकडून शिवाजी पार्क, तिथून ८७ पकडून कलानगर… ९ वाजता दादांसमोर हजर. तिथे गेल्यावर थोड्याच दिवसांत स. गो. बर्व्यांची निवडणूक… ठाण्याची निवडणूक… या जिंकल्या… शिवाय मुंबई नगरपालिकेची निवडणूक लढवली. तीत पहिल्याच सपाट्याला प्रजा समाजवाद्यांच्या (युती होती) धरून एकंदर ४४ जागा मिळाल्या. पहिल्या तडाख्याला कमाई वाईट नव्हती. यश मिळताच प्र.स. वाले ‘शिवसेने’वर प्रांतीयवादी म्हणून दुगाण्या झाडीत वेगळे झाले.
दादांच्या आज्ञेनुसार साहेबांच्या ज्या सभा होत त्यांचे साग्रसंगीत वर्णन मी ‘मार्मिक’मध्ये करीत असे. बातमीदार कधी नि कसा झालो कळलेच नाही. तयार झालेला मजकूर दादरला श्रीकांतजींकडे द्यायचा… ते टाइप, साईज वगैरे लिहून देत. मग प्रेसला नेऊन द्यायचा.
एक दिवस बाळासाहेबांनी मला दादांच्या ‘मठी’तून बाहेर पडताना पाहिलं आणि स्वत:शीच हसून म्हणाले, ‘‘भाग्यवान आहेस. नाहीतर मोठाले बी.ए. एम.ए. वगैरे तिसर्या दिवशी हाकलले जात होते. आता एक करा पत्रकारिता शिकून घ्या. नुसते खरवडणे नको. माझ्या पाठीवर थाप मारून ते कारने निघून गेले. या दरम्यान बातम्या करायला शिकलो होतोच. एक दिवस दादा म्हणाले, ‘‘तू कोकण्या ना? फार खवचट असतात कोकणी लोक. तसलं काही लिहीत का नाहीस?’’
मी त्या वेळच्या शिवसेनेवर उठता बसता आगपाखड करणार्या नेत्यांवर खवचट लिहून त्यांना दाखवले. त्यांनी ते १०० टक्के मार्कांनी पास केले. तसे त्या लेखाच्या मार्जिनमध्ये लिहिले. श्रीकांतजींनी लेखक म्हणून टोच्या नाव दिले. सदर सुरू झाले. त्यानंतर द. पां. खांबेटे, दि. वि. गोखले यांच्या उपदेशानुसार युद्धकथा, हेरकथा लिहायला लागलो. त्या श्रीकांतजींना आवडायच्या. गंमतीची गोष्ट अशी की, त्यासाठी लागणारा कच्चा माल मला गोखले रोडवरच्या दोन रद्दीच्या दुकानांमध्ये मिळाला. आठ-बारा आणे, रुपया-दोन रुपये एवढ्या भांडवलात शे-दीडशे पानाचे पुस्तक यायचे.
एकदा बाळासाहेबांनी विचारले, ‘‘पंढरी, मटेरियल कोणत्या लायब्ररीतून आणतोस?’’ ते मी प्रकाश हॉटेलच्या बाजूला आणि गंगाधर निवासच्या समोर असलेल्या रद्दीच्या दुकानातून आणतो, असे सांगितल्यावर म्हणाले, दादरला विचारवंत, लेखक, पत्रकार, वक्ते वगैरे पुष्कळ. ते मेले की त्यांची पुस्तके त्यांचे वंशज रद्दीवाल्याला देतात. पण तुझे चालू दे. लोकांना आवडते. दादासुद्धा जुन्या जमान्यातल्या लेखकांचे काय वाचायचे हे मला अधूनमधून सांगत. शिवाय मोठ्या लोकांच्या ओळखी झाल्या. कॉ. डांगे यांनी बरीच पुस्तके दिली. त्याचा एक परिणाम असा झाला की, मी कम्युनिझम कोळून प्यालो, पण कम्युनिस्ट झालो नाही.
इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे. कधी कधी आमचे काम बराच वेळ चालायचे. एकसुद्धा वाजायचा. तो वाजला की दादांच्या ‘मठी’बाहेर मीना वहिनी उभ्या असायच्या. मी बाहेर आलो की म्हणायच्या, ‘‘उपाशीपोटी कुठे निघालात? जेवून जायचं. साहेबांचा तसा हुकूम आहे. असं म्हणून मला पोटभर जेवायला घालायच्या.
‘मीना वहिनी म्हणजे आमची शिवसैनिकांची माऊली होती. कोणत्याही सभेहून आम्ही परत आलो की, सगळा समाचार त्यांना सांगावाच लागायचा. कोणाला मार पडला का, हॉस्पिटलात कोण… कोणत्या आहे, पकडले कोण गेले वगैरे माहिती घेऊन मग त्या नेते, शाखाप्रमुख, पोलीस अधिकारी यांना फोन करायच्या. काळजी घ्यायला सांगायच्या.’’
श्रीकांतजी ‘मार्मिक’मध्ये सिनेमाचे सदर लिहायचे ते फारच वाचकप्रिय होते. शिवाय दोन अर्ध्या पानांची कार्टून्स, छपाईकडचा सगळा भाग ते सांभाळायचे. त्यांचे उर्दू भाषेचे ज्ञान प्रचंड होते. शास्त्रीय संगीतात ते सदैव रंग भरायचे. कधी त्यांची समाधी भंगली की ओरडायचे. विलक्षण कमालीचे व्हायोलीनवादक होते. त्यांचे सगळे शिस्तीत असायचे. मला त्यांची एक गोष्ट आठवते. चित्रपट सेना निघाल्यानंतर एक निर्माता त्यांच्याकडे त्याच्या चित्रपटाचे संगीत सोपवायला आला. त्याला म्हणाले, ‘‘अजूनपर्यंत मी संगीतकार नव्हतो काय? चित्रपट सेना निघाल्यावर झालो? गेट आऊट!’’ त्यांनी त्या माणसाला चक्क हाकलून लावला. असो.
तर अशा प्रकारे दादांच्या सोबत काम करताना पत्रकाराला जी कसबे, कौशल्ये आवश्यक असतात ती सगळी मला अवगत झाली. ‘मार्मिक’चे सगळे काम घड्याळासारखे चालायला लागले. १९७२ साली मला वाटते एप्रिलअखेर दादांनी मला रोजचे काम आटोपल्यावर म्हटलं, ‘‘आता तुला सगळं यायला लागलं. टेक्निकली तू पत्रकार झालास. आता तू कोणत्याही शेठजीच्या पत्रात खपशील. पण तेवढ्यावर समाधान मानू नकोस. तू आतापर्यंत फक्त तंत्र शिकलास. टेबलाला जखडलेली नोकरी करायला तेवढे पुरेसे आहे. पण त्याने मुंबईत, महाराष्ट्रात, त्याच्या कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भ, खान्देशात काय चाललेय… आहे माहीत? तेथील लोकांचे जीवन, पिकं याची काय माहिती तुला आहे? जगात काय झाले, काय होतंय, काय होऊ घातलंय माहीत आहे? हे सगळं बारीकसारीक समजायला लागतं, जीव कळवळायला नि वळवळायला लागतो… तेव्हा खरा पत्रकार तयार होतो. शब्दांमध्ये अगत्य येतं. कळकळ येते. आपलेपणा येतो.
मी प्रत्येक शब्द मन लावून ऐकत होतो. त्यांनी बोलत रहावे असे मला वाटत होते. अचानक त्यांनी ट्रॅक बदलला. ते म्हणाले, माझी हयात आता पूर्णविरामापर्यंत आली आहे. आता तुझा गुरू तुझा व्हायला पाहिजे. आता ‘मार्मिक’मधून बाहेर पड आणि आभाळाखाली जा. कुठे बांधून घेऊ नको. अनुभव घेत जा. कळलं. उद्यापासून यायचं नाही.
मी सुन्न झालो. त्यांनी एक चिठ्ठी बाळासाहेबांना देण्यासाठी लिहिली. ‘मी पंढरीला मोकळा केला आहे. त्याला अडवू नये.’ आणि मला म्हणाले, ‘वर जा, बाळला दे.’ मी तसे केले. बाळासाहेब काही क्षण बोललेच नाहीत. मग म्हणाले, ‘दादांच्या निर्णयात मोडता घालणारा मी कोण?’
गंमत अशी की, तिथून बाहेर पडलो त्याच दिवशी संध्याकाळच्या आत मला ‘श्री’मध्ये नोकरी मिळाली.
१९९० साली पुन्हा ‘मार्मिक’मध्ये आलो. ती एक गंमतच आहे. सांगितलीच पाहिजे. १९६२ साली जो बाहेर गेलो तो नेपाळपासून रामेश्वरपर्यंत सगळे पालथे घालून. त्यासाठी वेगवेगळ्या नोकर्या करून परत आलो. त्यात दोन वेळा ‘श्री’ साप्ताहिक, दोन वेळा मराठी ‘ब्लिट्झ’, नारायण आठवलेंचे ‘प्रभंजन’, एक वेळा सुरेश भटांचे एक साप्ताहिक होते. नाव आठवत नाही. त्यात एक वेळ नागपूरचे दै. ‘लोकमत’, औरंगाबादला नव्याने निघालेले दै. ‘लोकमत’, कोल्हापूरच्या ‘पुढारी’, राजाराम शिंदे यांचे ‘मंदार’ अशी साप्ताहिके, दैनिके होती. परत आलो तर वसंत सोपारकरांनी मला ‘चित्रलेखा’चे मराठी साप्ताहिक काढण्यासाठी पकडले.
त्याचे काम सुरू होईपर्यंत त्याच ग्रुपच्या मराठी साप्ताहिकात काम करू लागलो आणि १९९० साली दुपारी उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ‘परत जाताना ‘मातोश्री’वर या. बस झाले आमच्या आजोबांनी दिलेले व्रत.’ त्याप्रमाणे गेलो. साहेबांना भेटलो.
‘उद्यापासून ‘मार्मिक’मध्ये बसत जा. मराठे आणि पडबिद्री या दोघांसाठी नारळ तयार आहेत. जो आधी जाईल, तिकडे काम सुरू कर.’ नाही म्हणणे शक्य नव्हते. ‘चित्रलेखा’ला फोन करून राजीनामा कळवला. दुसर्या सकाळी सेना भवनात ‘मार्मिक’मध्ये हजर झालो. संपादक सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे होते. ‘सामना’मध्ये अशोक पडबिद्री होते.
मराठेंनी ‘मार्मिक’चे ‘मार्मिक’पणच घालवून टाकले होते. त्याला ‘षटकार’ साप्ताहिकासारखे कौटुंबिक जिव्हाळ्याचे वगैरे केले होते…
त्यातली एक गंमत सांगतो, त्यांच्या परिचयाचे एक गृहस्थ इंग्रजी कथांची रूपांतरे करीत. त्याच्या एका कथेतले एक वाक्य इथे देतो. म्हणजे मराठेंनी कसला संच जमवला होता ते लक्षात येईल. ते वाक्य असे होते, ‘वसुंधराबाईंनी व्हिस्कीचा एक घोट घेतला आणि भाजीला फोडणी दिली. आपण त्या कोण त्या बाई होत्या त्यांच्या नावाचे मराठीकरण केले. पण त्यांना स्वयंपाक करताना व्हिस्की घ्यायला लावली. मी मराठेंना एवढेच म्हणालो, वसुंधरा हे नाव बदला व चा ब झाला तर घोटाळा होईल.
एकदा त्यांनी मला संपादकीय लिहायला सांगितले. त्या पानावर संपादकीय श्रेयनामावली असते त्या पानावरच ते आटोपले होते. ते माझे वीसेक मिनिटांत झाले. ते इतक्या लवकर कसे झाले, असा प्रश्न ह. मो.ना पडला होता. सुदैवाने मराठे पडबिद्रींच्या आधी गेले आणि मी पुन्हा माझ्या ‘मार्मिक’मध्ये दाखल झालो. बरोबर १८ वर्षांनी परत आलो. थोड्या दिवसांनी मला ‘कार्यकारी संपादक’ केले. या वर्षाच्या प्रारंभी निवृत्त होईपर्यंत काम केले. माझे पत्रकारितेचे शिक्षणही ‘ठाकरे’ घराण्यात झाले. प्रबोधनकार ठाकरेंसारखा तपस्वी गुरू भेटला. त्यांचा लेखनिक झालो. पण त्यांनी मला पत्रकार बनवून टाकले व ज्या काही उणिवा, दोष राहात असत ते बाळासाहेब, श्रीकांतजी दाखवून देत.
‘मार्मिक’च्या कामात घडलेला एक चमत्कारिक प्रसंग सांगतो. पत्रकार विजय वैद्य काही काळ माझ्या मदतीला येत असे. शिवसेना निवडणुकांमध्ये उतरली तेव्हा ‘सांज मार्मिक’ काढावा लागला. वसंतराव मराठे यांचा ‘शिवगर्जना’ आमच्याकडे आला. त्यामुळे वैद्यांची मदत मोठ्या मोलाची होती. तो इतका बुटका होता की साध्या टेबलावर झोपायचा. एका रात्री ‘सांज मार्मिक’साठी साधारण दोन स्टिक भरेल एवढा मजकूर कमी पडला. मी वैद्याला जागा केला. त्याने झटपट तेवढ्या जागेत बसेल एवढी बातमी लिहून दिली. बातमीचे हेडिंग होते, ‘उल्हासनगरला कॉलेज होणार’
मी त्याला म्हणालो, ‘अरे, तशी काही हालचाल नाही.’
तर तो म्हणाला, नसू दे. आपल्या बापाचे काय जाते? आणि लगेच झोपी गेला.
विशेष म्हणजे दोन-तीन महिन्यांनी उल्हासनगर येथे कॉलेज काढण्याचा खटाटोप सुरू झाला. विजय वैद्य आता बोरिवलीला राहतो.
इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे… बाळासाहेब ठाकरे यांनी मला ठीक केले नसते तर मी १९९६ सालीच आटोपलो असतो. मला हृदयविकार जडला. तो विकोपाला गेला. हे त्यांना कळताच त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि डॉ. मांडके यांच्याकडून बायपास करून मला हयात ठेवले. चार वर्षांनी हृदयाचे नवीन खेटके तयार झाले. त्यांनी पेसमेकर बसवून घेतला. त्याची बॅटरी बदलायची वेळ झाली तेव्हा ती बदलून घेतली. त्यानंतर मला भारी किमतीचा पेसमेकर बसवून घेतला. त्यामुळे मी आज ८६व्या वर्षात आहे. माझे हृदय चालते ठेवण्यात काही नाही तरी त्यांनी १५-२० लाख रुपये खर्च केले असतील.
एवढे आपलेपण कोणता स्वामी राखतो. माझ्या आयुष्यात त्यामुळे ‘मार्मिक’चे स्थान अनन्यसाधारण आहे.
माझ्या ‘मार्मिक’मधल्या कारकिर्दीमधल्या सगळ्या गोष्टी एका लेखात सांगणे शक्य नाही. त्या लिहायच्या म्हटल्या तर ग्रंथच लिहावा लागेल. पण मी आहे. मला थोडाफार आदर मिळतो तो प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे. एवढे म्हटले तर त्यात माझे पत्रकार-चरित्र सामावते.