पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये रविवारी पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानी जवांनानी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 3 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नौशेरा सेक्टरला लक्ष्य केले होते. पाकिस्तानच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाविरोधात हिंदुस्थानी लष्कराने रविवारी प्रत्युत्तरादाखल मोठी कारवाई केली. या कारवाईत पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झाले असून काही सैनिक जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव हिंदुस्थानी जवानांनी हाणून पाडला आहे. तसेच पाकिस्तानच्या चार चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत.
पाकिस्तानकडून रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करण्यात येत होती. नौशेरा सेक्टरच्या कलसिया परिसरात सीमेपलीकडून दहशतवाद्यांची एक टोळी घुसखोरीचा प्रयत्न करत होती. त्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायरिंग करण्यात येत होती. पाकिस्तानचा हा कट लक्षात येताच हिंदुस्थानी जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत घुसखोरीचा डाव हाणून पाडला. तसेच पाकिस्तानलाही चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे 17 वर्षांचा रेकॉर्ड तोडला आहे. 28 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानकडून 4700 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या गनसह छोट्या तोफांनी हल्ला करत सीमेजवळील गावांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येते. पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देत हिंदुस्थानी जवान पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडत आहेत.