महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष आगामी निवडणूका एकत्र लढणार असल्याचे बोलले जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे, माझी तर तशी इच्छाच आहे, असे वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. तीन पक्ष एकत्रित लढल्यांना त्यांना तात्कालीन फायदा होईल. पण ते एकत्रित आल्याने जी राजकिय पोकळी निर्माण होईल त्यामध्ये किती लोक मावतील हेदेखील महत्त्वाचे आहे. कारण दोन पक्ष त्या राजकिय पोकळीत मावणं कठिण असताना हे तीन पक्ष एकत्र येतील. याचा अर्थ त्यातील सर्वात मोठी पोकळी ते भाजपसाठी मोकळी सोडणार आहेत. ती पोकळी भाजप व्यापल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा एखाद्या निवडणूकीत इकडे तिकडे झालं तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही, अशी मल्लिनाथी फडणवीस यांनी यावेळी करतानाच भाजपमधील आमदार फुटणार या फक्त वावडय़ा आहेत, असेही सांगितले.
नाशिक भाजपमध्ये नाराजी
बाळासाहेब सानप यांनी अवघ्या दोन वर्षात तीन पक्ष बदलले आहेत. आता चौथ्यांदा त्यांनी घरवापसी केली. मात्र, दोन वर्षात तीन पक्ष बदलणाऱया नेत्याला पक्षात प्रवेश कशासाठी दिला जात आहे? असा सवाल भाजपच्या एका गटातून करण्यात येत आहे. सानप हे आज पक्षात येतील आणि महापालिका निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी पक्ष बदलला तर अशी शंकाही या गटाकडून व्यक्त करण्यात आल्या असून सानप यांच्या पक्षप्रवेशाआधी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून त्यांनी नाराजी व्यक्त केली.
बाळासाहेब सानप यांची घरवापसी, दोन वर्षांत चौथ्यांदा पक्षबदल
माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करत आज भाजपात प्रवेश केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी कमळ हाती घेतलं.
सौजन्य- सामना