प्रँक व्हिडीओच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ बनवून ते यूट्यूब चॅनेल तसेच फेसबुक पेजवर प्रसारित करणाऱ्या तिघांच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींनी अशा अश्लील कृत्याकरिता लहान बालकांचादेखील वापर केला असून त्यांनी यातून दोन कोटींहून अधिक रकमेची कमाई केल्याचे तपासात समोर आले आहे.
काही तरुण प्रँक व्हिडीओच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी अश्लील व्हिडीओ बनवतात. मग ते व्हिडीओ यूटय़ूब चॅनेल व फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित करतात. अशा व्हिडीओसाठी तरुणींवर जबरदस्ती केली जाते. तसेच व्हिडीओ प्रसारित केल्यानंतर त्याची भीती दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ते तरुण धमकावतदेखील असल्याची तक्रार पाच पीडित मुलींनी सायबर पोलिसांकडे केली होती. याची तत्काळ गंभीर दखल घेत सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून असे अश्लील व्हिडीओ प्रसारित करणारे मुकेश गुप्ता (29), प्रिन्स पुमार साव (23) आणि जितेंद्र गुप्ता (25) या तिघांना पकडले. हे आरोपी 17 यू टय़ूब चॅनेल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून असे अश्लील व्हिडीओ प्रसारित करीत होते. प्रँक व्हिडीओ बनवत असल्याचे सांगत हे तिघे सार्वजनिक ठिकाणीच महिला, तरुणी तसेच अल्पवयीन मुलींशी अश्लील पृत्य करायचे. मग मोबाईलवर त्याचे चित्रीकरण करून ते प्रसारित करायचे. असे करून ते लाइक्स आणि व्हुवर वाढवायचे. त्यामुळे त्यांना दोन कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. त्यांचे यू टय़ूब चॅनेल बंद करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले.
मुकेश दहावीतला टॉपर आणि शिकवणीचा सर
या गुह्याचा मास्टरमाइंड मुकेश हा 2008 साली दहावीत टॉपर होता. तसेच तो शिकवणी घेतो. त्याच्याकडे 300 हून अधिक विद्यार्थी शिकवणीला येतात. मुकेशने शिकवणीला येणाऱया अल्पवयीन मुलींचेदेखील अश्लील व्हिडीओ बनवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर प्रिन्स आणि जितेंद्र हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून या तिघांनी झटपट पैसा कमावण्यासाठी हे कृत्य सुरू केले होते.
सौजन्य : दैनिक सामना