नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. खूप चर्चा झालेली ही पहिलीच वेबसिरीज ठरली होती. त्यामुळे लगोलग तिचा तिसरा सिझनही येणारच असेच लोकांना वाटायला लागले होते. पण पहिल्या दोन सिझनमध्येच जे दाखवायचे ते दाखवून पूर्ण झालेय. आता दाखवण्यासारखे काहीच उरले नाही असे खुद्द नवाजुद्दीन सिद्दीकीच म्हटल्याने लोकांची सपशेल निराशाच झाली आहे. नवाज म्हणतो, तिसरा सिझन कसा येईल? काय दाखवणार त्यात? आधीच्या दोन भागांत ते पूर्ण झालंय. दुसऱ्या भागाला पहिल्याइतका रिस्पॉन्स मिळाला नाही, असेही तो स्पष्ट करतो. पहिल्या दोन्ही सिझन्समध्ये नवाजुद्दीनसोबत सैफ अली खान, कल्की कोचलीन, रणवीर शौरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवरून हे दोन भाग बनवण्यात आले होते. दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी केले होते. दुसऱ्या भागाबद्दल अभिनेता पंकज त्रिपाठी म्हणतो, नग्नताच पाहायची असेल तर पोर्नोग्राफी हा पर्याय आहे ना… वेबसिरीजमध्ये ती शोधणे चुकीचे आहे.