ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टच्या जल्लोषाचे प्लॅनिंग जर तुम्ही करीत असाल तर जरा सबूर! जल्लोष आता तुम्हाला घरातच करावा लागेल, कारण उद्या मंगळवारपासून मुंबई-ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये नवा धोकादायक कोरोना विषाणू आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात पुढील 15 दिवस हाय अलर्ट जारी करण्याचे आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मध्य-पूर्व देशांतून येणाऱया सर्व प्रवाशांना 14 दिवस संस्थात्मक तर इतर देशांतून येणाऱयांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने तिथे पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली.
परदेशी प्रवाशांची क्वॉरंटाइननंतर पाचव्या, सातव्या दिवशी कोरोना चाचणी
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपियन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱया विमानतळावरील सर्व कर्मचाऱयांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव संजय पुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषपुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
लक्षणे आढळल्यास स्वतंत्र रुग्णालयात व्यवस्था
ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाचीदेखील व्यवस्था करण्यात यावी. युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांची बैठक घेणार
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱया विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फाइव्ह स्टार हॉटेल्ससह 2000 रूम तैनात
- ब्रिटनहून येणाऱया प्रवाशांना सात दिवस सक्तीने क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने ताजसारख्या फाईव्ह स्टार हॉटेलसह बजेट हॉटेलमध्ये हजार रूम तैनात आहेत.
- लक्षणे असलेल्या प्रवाशांना सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. तसेच बुधवारपासून युरोप आणि मध्य पूर्व आशियातून येणाऱया प्रवाशांना आठवडाभर पालिका क्वॉरंटाइन करणार आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
- नाइट कर्फ्यूमध्ये पोलिसांसोबत पालिकाही विशेष लक्ष ठेवणार आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र आढळल्यास कारवाई होईल.
सात लाख कोटींचे नुकसान
ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा धसका शेअर बाजारानेही घेतला. सेन्सेक्स तब्बल 2000 अंकांनी कोसळला तर निफ्टीत 400 अंकांची घसरण झाली. गुंतवणूकदारांचे सात लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
सौजन्य- सामना