सरत्या वर्षाला निरोप द्या. अगदी मनापासून द्या. आनंदाने द्या. कारण नव्या वर्षात नकोय तो कोरोना. पण खरंच ती इच्छा असेल तर थर्टी फर्स्टच्या दिवशी ‘सेफ्टी फर्स्ट’चा विचार करावाच लागेल. संसर्ग होणार नाही अशी पार्टी यंदा साजरी करावी लागणार आहे.
सेलिब्रेशन रात्री 11च्या आतच आटोपते घ्यावे लागणार आहे. नाहीतर बाराच्या भावात जावे लागेल. कारण नाक्यानाक्यांवर, गल्लोगल्ली पोलिसमामा तैनात असणार आहेत. इतकेच काय तर गच्चीवर धिंगाणा करण्याचा प्लॅन केलात तर आकाशातूनही तुमच्यावर ड्रोनने नजर असणार आहे. पार्टीला बाहेर जाऊन दारू पिऊन गाडी चालवत याल तर तुमच्यासकट सहप्रवाशालाही नववर्षात तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
कोरोनाने हैराण करून सोडणाऱया ‘2020’ला गुडबाय करण्यासाठी उद्याचा थर्टी फर्स्ट जल्लोषात साजरा करण्याचे प्लॅन बहुतांशांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. रात्री 11 नंतरची संचारबंदी कायम आहे. 2021 चे स्वागत करताना बेभान होऊन गर्दी करणाऱयांवर अंकुश ठेवण्यासाठी हजारो पोलीस जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी तर ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
थर्टी फर्स्ट साजरा करण्यास कुणाचाही मज्जाव नाही. फक्त नियमांचा भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरन्ट्स रात्री 11 पर्यंतच चालू ठेवण्याची परवानगी असल्याने अनेक जण घरी किंवा सोसायटीत पार्टी करून फिरायला बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशांवर कडक कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
चारपेक्षा जास्त व्यक्ती रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शेवटची ऑर्डर साडेनऊला
अनेकांनी घरातच राहून नवीन वर्षाचे सुस्वागतम करण्याचा बेत आखला आहे. पण फूड बाहेरून मागवणार असाल तर वेळेचे भान ठेवावे लागेल. कारण रात्री साडेनऊनंतर कोणतीही ऑनलाईन ऑर्डर न स्वीकारण्याचा निर्णय हॉटेलचालकांच्या ‘आहार’ संघटनेने घेतला आहे.
मजा करा, पण जमाव नको
नववर्षाच्या स्वागतासाठी मजा करणाऱयांना जमाव करण्यास यंदा निर्बंध आहेत. हवी तितकी मजा करा पण जमाव दिसला तर पोलिसांना कारवाई करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी अशा कारवाया अधिकच तीव्र केल्या आहेत.
घरी करा ‘मद्य’रात्र
रात्री 11 वाजेपर्यंतच बार, रेस्टॉरन्ट उघडी राहणार आहेत. त्यामुळे यंदा बाहेर जाण्यापेक्षा नववर्षाची ‘मद्य’रात्र घरीच साजरी करणे योग्य ठरणार आहे. दिवसाच स्टॉक खरेदी करून रात्रभर नव्हे, अगदी 1 जानेवारीच्या पहाटेपर्यंत घरीच राहून पार्टी करायला कुणाचीही हरकत असणार नाही.
बार, रेस्टॉरंटवर करडी नजर
यावर्षी बार आणि रेस्टॉरन्टमधील हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि बार, रेस्टॉरन्टच्या केवळ प्रवेशद्वारावरच नव्हे तर मागील दारावरही पोलिसांचा वॉच असणार आहे. साध्या वेषातही पोलीस तैनात असणार आहेत.
मद्यपी चालकासोबत प्रवास करणाऱयांवरही गुन्हा दाखल होणार
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत मद्यपी चालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यास तेव्हा त्या वाहनात असणाऱया सहप्रवाशाविरोधात मोटार परिवहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 3 हजार मुंबई वाहतूक पोलीस हे कारवाईसाठी रस्त्यावर असणार आहेत. मद्यपी चालकावर कारवाईसाठी 93 ठिकाणी वाहतूक पोलिस नाकाबंदी लावण्यात येणार आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यपी चालकाला वाहतूक पोलिसांनी पकडल्यास मद्यपी चालकाची जवळील रुग्णालयात रक्त चाचणी केली जाईल. गेल्या वर्षी पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री 677 मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. त्या चालकांचे वाहतूक परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यासाठी आरटीओकडे पाठवले होते असे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी सांगितले.
सौजन्य- सामना