मुळातच मराठी कलाकार हिंदी मालिकेत काम करायला जात नाहीत. जे थोडेफार जातात त्यांचे सेटवर जंगी स्वागत वगैरे असा प्रकार कधी घडत नाही. म्हणूनच मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे हिंदीतल्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेच्या सेटवर झोकात आणि जंगी स्वागत होते तेव्हा कमाल वाटते. या मालिकेत नुकताच तिचा प्रवेश झाल्याची बातमी आली होती.
यात ती गोरी मेमच्या भूमिकेत दिसणार आहे असेही त्या बातमीत नमूद करण्यात आले होते. नेहाने नुकतेच या मालिकेसाठी चित्रीकरण सुरू केले आहे. त्याचवेळी सेटवर तिचे पाऊल पडताच तिचे धडाक्यात स्वागत झाले. सेटवर उपस्थित सर्व कलाकारांनी केक कापून नेहाचे स्वागत केले. यावेळी नेहाने मरून कलरची साडी नेसली आहे. या साध्या लुकमध्येही ती कमालीची सुंदर दिसते आहे. ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेत शुभांगी अत्रे, रोहिताश गौड आणि आसिफ शेख यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.