त्या काळोख्या स्तब्धतेतून धीमी पावलं टाकत नीरज आमच्या जवळ आला. `सुनो अक्षय…’ म्हणत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला, त्याच्या कानात काही सांगत एका कोपर्यात घेऊन गेला.
दहा मिनिटं शांतपणे तो अक्षय कुमारला काय समजावत होता कुणास ठाऊक… पुढे सिनेमाभर अक्षय कुमारने `एकही’ सूचना केली नाहीच… पण प्रत्येक शॉटच्या आधी अगदी हम्बल होऊन नीरज जे सांगायचा ते ते तो करत गेला.
`स्पेशल छब्बीस’चं केम्प्स कॉर्नरला शूट चालू होतं… सकाळी नऊ ते रात्री नऊची शिफ्ट होती. नीरजने दुपारी साडेतीनलाच पॅकअपची घोषणा केली. मी जवळच होतो. मी म्हटलं-
`सर… इतनी जल्दी पॅकअप?’
`हां… सीन खतम हो गए सारे… ऐसेही क्यूं खेलते बैठें? घर चालते हैं यार!’
`स्पेशल छब्बीस’च्या जवळ जवळ सार्या शूटला मी उपस्थित होतो… सिनेमा पाहिला आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली… सिनेमामध्ये `एकही’ एक्स्ट्रा शूट केलेला शॉट नव्हता…
जितकं शूट केलं होतं बास्स… तितकंच लावलं होतं.
सिनेमामध्ये आपल्याला नक्की नेमकं काय हवं ते स्पष्ट माहीत असलेला, सिनेमाच्या तांत्रिक बाबींवर प्रगाढ विश्वास आणि पकड असलेला, अभिनेत्यांना सहृदयपणे, समजूतदारपणे हाताळणारा, कॅमेर्याशी जन्मांतरीची ओळख असल्यागत प्रत्येक शॉट अचूक भेदणारा, विषयाच्या खोल गर्भात उतरून त्याचा कोपरा न् कोपरा उजागर करत विणकाम करणारा, माणुसकी शब्दातला जिव्हाळा स्वतःच असलेला, अतिशय तीक्ष्ण बुद्धिमतेचा मालक नीरज पांडे याने `गा़लिब डेंजर’ नावाची इंग्रजी कादंबरीही लिहिली आहे, जी वाचून `इससे अच्छा तो आप फिल्मही बना देते… बुक क्यूँ… खालीपिली…’ या माझ्या प्रतिक्रियेवर खळाळून हसणारा व नंतर `इन्शालाह कभी चान्स मिला तो बनाएंगे’ म्हणणार्या नीरज पांडे याची माझी पहिली भेट `तार्यांचे बेट’ सिनेमाच्या सेटवर कोकणात झाली होती. तो हा सिनेमा प्रोड्युस करत होता. सचिन खेडेकर प्रमुख भूमिकेत, किरण यज्ञोपवीत दिग्दर्शकाच्या जबाबदारीत आणि माझी एक छोटीशी भूमिका जी मी `नीरज पांडे’ निर्माता आहे केवळ म्हणून केली होती, पण तो पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी सेटवर हजर होता… त्याचा `वेड्नसडे’ नुकताच पाहून भंजाळून गेलो होतो… एकदा, दोनदा, तीनदा… मी नक्की काय पाहायला गेलो होतो?
गोष्ट?
त्याचा स्क्रीन प्ले?
त्याचे संवाद?
नसीरजींचं काम?
की त्याचं दिग्दर्शकीय कौशल्य?
सिनेमा पाहून या दिग्दर्शकाशी बोलावं असं खूप आतून वाटलं होतं आणि `अगर तुम शिद्दत से कुछ चाहो तो सारी कायनात वो चीज़ आपको देने मे आपकी मदद करने लगती है…’ या शारुखच्या डायलॉगला अनुसरून कायनातने मला मदत केली होती आणि `तार्यांचे बेट’मध्ये मला किरण्याने छोटी भूमिका विचारली होती. काम नंतर, आधी बोलू याच्याशी म्हणून ओळख झाल्या झाल्या मी त्याला चिकटलोच… `वेड्नसडे’बद्दल अनेक प्रश्न झाल्यावर कळीचा एक प्रश्न मी त्याला विचारला, `नसीरजी का काम कितने दिनों मे पुरा हुआ?’
`यही कुछ पाँच दिन…!’
`पाँच? बस? सिर्फ़ पाँच?’
`हाँ… क्यूँ?’
`नहीं… मुझे लगा कुछ दस पंद्रह दिन तो लगे होंगे.’
`अरे नहीं… नसीरसाहब को याद था पूरा… और एक बार नसीरजी जैसा अॅक्टर आपके साथ हों तो सब कुछ आसान हो जाता है.’
किती खरं होतं हे! नसीरजींनी त्यात जे काम केलं होतं तो राग प्रत्येक भारतीयाच्या मनातला होता आणि `वेड्नसडे’ पाहिल्यावर माणूस थिएटरमधून हादरूनच बाहेर पडतो. अतिरेक्यांची दहशत सिनेमातून इतकी अंगावर आली होती की सिनेमा लगेच हिट होऊन गेला होता आणि `नीरज पांडे’ हे नाव अराईव्ह झालं होतं. सिनेमा पाहिल्यावर नीरजजींची जी एक इमेज मनात तयार झाली होती त्याला उभे आडवे छेद देणारं त्यांचं व्यक्तिमत्त्व निघालं होतं. पहिल्या भेटीतच खूप जुन्या मित्राप्रमाणे मला अतिशय कम्फर्टेबल करत नीरज बोलला होता. या वाक्यातच तो काय असेल ही कल्पना येईल… म्हणून यापुढे मी त्याला नीरजच म्हणेन.
मग नीरजने एक दिवस अचानक मला `स्पेशल छब्बीस’मध्ये कास्ट केलं… स्टार अर्थातच अक्षय कुमार होता… अनुपमजींनी माझ्या काही हिंदी नाटकांचे प्रयोग पाहिले असल्याने ते मला ओळखत होते… खरं तर त्यांच्याशी माझी आणि राजेश शर्माची जास्त गट्टी जमली.
शूटच्या पहिल्याच दिवशी शूटच्या पहिल्या सीनला आम्ही चौघे उभे होतो… दोनदा रिहर्सल झालेली होती… आता शॉट होणार होता, इतक्यात अक्षय कुमार त्याच्या स्टारडमच्या अॅटिट्यूडमध्ये मोठ्ठ्याने `नीरज… मैं ऐसा करता हूँ शॉट मे…’ म्हणून एक सजेशन दिली. नीरजचा कुठूनतरी माईकवरून फर्म नकार आला…
`नो… नो अक्षय… डोन्ट डू दॅट.’
शांतता! एका स्टारला दिग्दर्शक नाही म्हणत होता… अक्षयने खाड्कन अनुपजींकडे पाहिलं… सगळं युनिट स्तब्ध झालं…
पण अक्षय कुमारनेच मग `ओके ओके… आय वोन्ट डू दॅट… लेट्स…’ म्हणत शॉट सुरू झाला…
दुसर्या की तिसर्या शॉटला पुन्हा अक्षय कुमारने काही सजेशन दिली आणि नीरज कुठून तरी माईकवर…
`नो नो अक्षय… डोन्ट डू दॅट…’
पुन्हा स्तब्धता…
पुन्हा अक्षय कुमार एक पाऊल मागे झाला.
`अॅज यू से…’ म्हणत तोही शॉट ओके झाला.
पाचव्या शॉटला आम्ही चौघे उभे असताना अक्षय कुमार, त्याच्या खोडकर अंदाजात आम्हाला…`अब देखो नीरज `नहीं’ बोलेगा हां’ म्हणत पुन्हा मोठ्ठ्याने नीरजला काही सजेशन दिली.
या वेळी नीरजचा कुठूनही आवाज आला नाही.
त्या काळोख्या स्तब्धतेतून धीमी पावलं टाकत नीरज आमच्या जवळ आला. `सुनो अक्षय…’ म्हणत त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला, त्याच्या कानात काही सांगत एका कोपर्यात घेऊन गेला.
दहा मिनिटं शांतपणे तो अक्षय कुमारला काय समजावत होता कुणास ठाऊक… पुढे सिनेमाभर अक्षय कुमारने `एकही’ सूचना केली नाहीच… पण प्रत्येक शॉटच्या आधी अगदी हम्बल होऊन नीरज जे सांगायचा ते ते तो करत गेला.
नीरजने अक्षय कुमारसारख्या, पहिल्यांदा नीरजसोबत काम करणार्या `स्टार’ला एका कोपर्यात `जे’ समजावलं असेल `ते’ सगळ्या नवीन दिग्दर्शकांना येवो ही सदिच्छा.