कोरोना युद्धात जिवाची बाजी लावून काम करणाऱया पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय आता एक वर्षाने वाढणार आहे. हा निर्णय 2021मध्ये पालिकेचे जे वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनाच लागू होणार आहे. सध्या पालिका रुग्णालयात सेवा देणाऱया आरोग्य कर्मचाऱयांच्या निवृत्तीचे वय 58 वर्षे आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणा अंतर्गत पदे भरण्यासाठी आलेली स्थगिती, पदोन्नतीसाठी अर्हताधारक उमेदवार उपलब्ध नसणे, नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीने सतत रिक्त होत असलेली पदे, यामुळे सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांपैकी 40 ते 50 टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णसेवेबरोबरच प्रशासकीय कामांमध्येही मनुष्यबळाची कमतरता आहे.
पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱयांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळेही सेवानिवृत्तीचे वय 58वरून एक वर्षाच्या कालावधीकरिता तात्पुरत्या स्वरुपात वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्थायी समितीच्या आगामी बैठकीत याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.