मुंबईकरांना सर्वोत्तम शुद्ध पाणीपुरवठा करणारी पालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या देशात गौरव झाला आहे. इंडियन वॉटर वर्कस् असोसिएशनकडून शुक्रवारी हैदराबाद येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.
पालिकेचे जल अभियंता अजय राठोर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील 20 प्रमुख शहरांच्या पाणीपुरवठय़ात मुंबई महानगरपालिकेचे पाणी सर्वात शुद्ध असल्याचे स्पष्ट झाल्याने हा पुरस्कार देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईकरांना अल्प दरात नागरी सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये एक हजार लिटर पाणी शुद्ध करण्यास पालिका सुमारे 16 ते 24 रुपयांचा खर्च करते आणि हेच पाणी मुंबईकरांना 3 ते 4 रुपयांपर्यंत एक हजार लिटर असे दिले जाते. पाणी शुद्धीकरणासाठी पालिकेकडून भांडुप, पांजरपोळ या ठिकाणी प्रक्रिया केली जाते. यासाठी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतूनही वेळोवेळी नमुने घेऊन तपासणीही केली जाते. मुंबईकरांना मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. इतक्या मोठय़ा प्रमाणावर पाणीपुरवठा करूनही पालिकेचे पाणी देशातील 20 शहरांच्या तुलनेत सर्वोत्तम ठरले आहे.
अशी झाली शुद्धता-दर्जामध्ये वाढ
सुमारे सवा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका तब्बल 150 किमीवरून पाणी आणते. शेवटच्या घटकापर्यंत मिळणारे पाणीही शुद्ध असते. इंडियन वॉटर वर्कस् असोसिएशनकडून ‘जल निर्मलता’ अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईत वेगवेगळ्या 10 ठिकाणांचे नमुने घेण्यात आले होते.
देशातील एकूण 20 शहरांत असे सर्वेक्षण-तपासणी करण्यात आले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे पाणी देशात सर्वोत्तम ठरले. यामध्ये पाण्याच्या दर्जात्मक आणि शुद्धता वाढीमध्ये 2012-13 मधील 83 टक्क्यांवरून सद्यस्थितीत 99.34 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
सौजन्य : दैनिक सामना