मुंबईत अनलॉकची स्थिती असतानादेखील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्याने विद्यार्थी, शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. बोर्डाच्या परीक्षांच्या तोंडावर मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा विद्यार्थ्यांसाठी बंदच असल्याने अभ्यासावर पाणी पडले आहे.
प्रिलियम परीक्षेत लिहिण्याचा सराव, सायन्स विषयांचे प्रॅक्टिकल, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयांचे मूल्यमापन कसे करणार, असा प्रश्न शाळांसमोर आता निर्माण झाला आहे.
शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे जाहीर केले. याआधीच 23 नोव्हेंबरपासून मुंबई वगळता अन्य जिल्ह्यांत नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत, मात्र मुंबईत शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे प्रचंड नुकसान होत आहे.
प्रिलियम परीक्षेत वेळेत पेपर सोडविण्याचा सराव व्हावा, सायन्य विषयाची प्रॅक्टिकल करता यावी तसेच तोंडी परीक्षा आणि श्रेणी विषयांचे मूल्यमापन करण्यासाठी तरी मुंबईतील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे, अशी मागणी होत आहे.
लेखी परीक्षेशिवाय मूल्यमापन अशक्य!
आठवीपर्यंत नापास न करण्याच्या धोरणामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन मूल्यमापन करून त्यांना वरच्या वर्गात पाठवणे शक्य आहे, मात्र नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखा परीक्षा घेतल्याशिवाय त्यांचे मूल्यमापन अशक्य असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.