शिवसेनेच्या वतीने गोरेगाव येथे गुजराती बांधवांचा भव्य मेळावा होणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी रविवार 21 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हा तिसरा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये 31 उद्योगपती आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गुजराती बांधवांचा शिवसेनाला मोठा पाठिंबा मिळत असून हेमराज शाह यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत नुकतेच दोन मेळावे पार पडले आहेत. त्यांनतर आता 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सरदार पटेल हॉल, सिटी सेंटरसमोर, एस. व्ही. रोड गोरेगाव (पश्चिम) येथे तिसरा मेळावा आयोजित केला आहे. हेमराज शाह यांच्या नेतृत्वाखाली होणाऱया या मेळाव्याला आमदार गीता जैन, हेमेंद्र मेहता, नगरसेविका राजूल पटेल, संध्या दोशी, बिरेन लिंबचीया, राजेश दोशी, जयंती मोदी, कल्पेश मेहता उपस्थित राहणार आहेत. यावेळी चेतन गढवी, अमीता राणा हे कलाकार गुजराती डायरा प्रस्तुत करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा मेळावा होणार असून प्रथम येणाऱया शंभर लोकांना सभागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि बिरेन लिंबाचीया यांनी स्पष्ट केले आहे.