कोस्टल रोडच्या मार्गातील दोन महाबोगदे खोदण्याचे काम 11 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून आणलेले देशातील सर्वात मोठे ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिन वापरले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ होणार आहे. बोगद्यांचे काम पुढील 18 महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.
कोस्टल रोडचा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंक असा 9.98 किमी लांबीचा पहिला टप्पा पालिका तयार करत असून यासाठी 12721 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कामात प्रियदर्शनी पार्प ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2.082 किलोमीटर लांबीचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. हे काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या बोगद्यासाठी देशातील सर्वात मोठी टनेल बोअरिंग मशिन वापरली जाणार आहे. या मशिनचा व्यास 39.6 फूट असून लांबी 400 मीटर आहे. ही मशिन चीनमधून आणली आहे. सध्या कोस्टल रोडचे काम सुमारे 20 टक्के पूर्ण झाले असून जुलै 2023 काम पूर्ण होऊन या मार्गावर वाहने वेगाने धावतील असे नियोजन आहे. या कामात महत्त्वपूर्ण ठरणाऱया देशातील सर्वात मोठय़ा टनेल बोअरिंग मशीनच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 1 वाजता डी वॉर्डमधील प्रियदर्शनी पार्क येथे होणार आहे.
हा बोगदा विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येत असून बोगद्यात काही दुर्घटना घडल्यास स्काडा पद्धतीमुळे पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष, मुंबई अग्निशमन दल, पोलीस व वाहतूक पोलीस या यंत्रणेना तत्काळ मेसेज जाणार असून तातडीने मदत करणे शक्य होणार आहे.
असे होणार बोगद्याचे काम…
- कोस्टल रोडवर 2.082 किलोमीटरचे दोन बोगदे असणार आहेत. जमिनीपासून 10 ते 70 मीटर खाली हे बोगदे खोदण्यात येतील. जमिनीखालील बोगद्यांमध्ये एकूण 6 लेन असणार आहेत. हे बोगदे खोदणाऱया मशीनला ‘मावळा’ असे मराठमोळे नाव देण्यात आले आहे.
- बोगद्याच्या अंतर्गत व्यास 11 मीटर असणार आहे. कोस्टल रोडवर जाण्यासाठी अमरसन्स गार्डन येथे 4 ठिकाणी, हाजी अली येथे 8 ठिकाणी, वरळी येथे 6 ठिकाणी इंटरचेंज म्हणजेच वळण रस्ते ठेवण्यात येणार असून ते रस्ते मुंबईतील रस्त्यांना जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.