प्रत्येक दिवशी रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईत कोरोना आणि भीती हे दोन्ही पसरले आहेत. कोरोनाला वेसण घालण्यासाठी महापालिकेने पंबर कसली असून आज पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळले म्हणून चेंबूरमधील 4 इमारती सील करण्यात आल्या. आता पुढील 14 दिवस या इमारतींमधील रहिवाशांना खाणे-पिणे ऑनलाईन आणि ‘वर्क फ्रॉम होम’ हे नियम पाळावेच लागणार आहेत. दरम्यान, देशांतर्गत आणि परदेशातून मुंबईत आलेल्या 90 प्रवाशांचे स्वॅब पुणे येथील व्हायरॉलॉजिकल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
गेल्या 8 दिवसांत चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांचा दरदिवशीचा आकडा 15वरून 29वर गेल्यामुळे पालिकेने सुमारे 550 इमारतींना क्वारंटाईनचे नियम पाळा नाही तर कारवाई करू, असा इशारा दिला होता. मात्र रहिवाशांच्या मानसिकतेत काही बदल न झाल्यामुळे पाचपेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या चार इमारती आज पालिकेने कारवाई करत सील केल्या.
चेंबूर मैत्री पार्प येथील सफल हाईट, चेंबूर पोलीस ठाण्यासमोरील नवजीवन सोसायटी, सिंधी सोसायटी बंगलो नं 13मधील साई त्रिशूल आणि आर.सी. मार्ग मारवली गावाजवळ शिवधाम सोसायटी या चार इमारतींमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 5पेक्षा जास्त झाल्यामुळे या इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुढील 14 दिवस यातील रहिवाशांना इमारतींबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. 14 दिवसांनंतर या इमारतींमधील रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून संख्या कमी झाली तर सील उठवण्यात येईल, मात्र रुग्णसंख्या कमी झाली नाही तर इमारत सील राहणार आहे, अशी माहिती एम-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान यांनी दिली.
पालिकेने मुंबईकरांसाठी खबरदारी घेत सर्व व्यवहार सुरळीत ठेवले आहेत, मात्र कोरोनाच्या संकटाला मुंबईकर गंभीरपणे घेत नाहीत. त्यांच्या बेफिकीर वृत्तीमुळे या इमारती सील करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील इतर भागांत अशा प्रकारे रुग्ण सापडले तर पालिका अशीच कारवाई करणार आहे. निदान या कारवाईतून तरी मुंबईकरांनी धडा घ्यावा आणि स्वतःची इमारत सील होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियम पाळावेत. – पृथ्वीराज चौहान, सहाय्यक आयुक्त, एम-पश्चिम
…अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल ः भुजबळ
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्हय़ांत लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात येत आहेत. नाशिक जिल्हय़ात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शासनाला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.मास्क व सॅनिटायझरचा वापर केला, सुरक्षित अंतर पाळले तर सर्वच सुरक्षित राहतील. या नियमांचे काटेकोर पालन केले नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर लोकांचे जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊन करावा लागेल, तो सौम्य असेल की अतिकडक असेल हे पूर्णपणे जनतेच्या हातात आहे. सरकारला लॉकडाऊन करण्याची हौस नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारची रुग्णसंख्या
राज्य – 6122
मृत्यू – 44
मुंबई – 823
मृत्यू – 05
नागपूर हॉटस्पॉट
24 तासांत 754 बाधित, 8 जणांचा मृत्यू
– पुण्यात मास्क न घालणाऱयास पहिल्यांदा 500 रुपये आणि दुसऱयांदा एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
हम नही सुधरेंगे
‘मास्क लावण्याची’ राज्य सरकारची विनंती धुडकवणारे महाभाग मुंबईत कित्येक आहेत. या अशाच ‘ न सुधारणाऱया’ मुंबईकरांमुळेच कोरोना वाढतोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही. लोकल प्रवासात तर हे चित्र हमखास पाहायला मिळते.