मुंबईत लोकल ट्रेनमुळे कोरोना रुग्ण वाढल्याचा दावा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी केला आहे. 20 लाखांवरून प्रवासी संख्या 35 लाखांवर गेली. ज्यांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली त्यांनाही लागण झाली. त्यामुळे सर्वांसाठी सर्व वेळ लोकल हा विचार आता काही काळ दूर ठेवावा लागेल, असे डॉ. जोशी म्हणाले.
राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, तीन जिह्यांतील नवीन स्ट्रेन, कोविडची लस घेतल्यावरही डॉक्टरांना झालेली कोरोनाची लागण यावर डॉ. शशांक जोशी यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली.
लस घेतल्यावरही कोरोना होऊ शकतो
लस घेतल्यावरही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, एक डोस घेतल्यावर लगेच प्रतिकारशक्ती वाढत नाही. लसीचे दोन डोस घेतल्यावर त्याच्या 15 दिवसांनी प्रतिकारशक्ती निर्माण होते. दोन डोसांनंतर शरीरात ऍण्टीबॉडीज तयार होतात, मात्र त्याच्यानंतरही सतत मास्क घालावाच लागणार आहे. लस घेतल्यानंतरही कोविड होण्याची शक्यता असते. लसीमुळे कोविडची तीव्रता कमी होते आणि जिवाला धोका निर्माण होत नाही. लस घेतली म्हणजे 100 टक्के कोरोना होणार नाही हे कोणीही समजू नये, असा स्पष्ट इशारा डॉ. जोशी यांनी दिला. लस घेतल्यावर कोविड होत नाही असा आत्मविश्वास हेल्थ केअर वर्कर्समध्ये निर्माण झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लॉकडाऊनची गरज नाही
कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का, असा प्रश्न त्यांना केला असता आता लॉकडाऊनची गरज पडणार नाही. मिनी कंटेनमेंट झोन करावे लागतील. सरकारने सर्व कोरोनाच्या हॉटस्पॉटना लहान स्वरूपाच्या कंटेनमेंट झोनमध्ये टाकले आहे.
यलोचा रेड सिग्नल नको
सध्या यलो सिग्नल आहे, त्याचा रेड सिग्नल नको. मास्क, शारीरिक अंतर, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे भान राखून ग्रीन सिग्नलच ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लोक कापडाचे साधे मास्क वापरत आहेत याकडे त्यांचे लक्ष वेधले असता कापडाचे मास्कही वापरण्यास हरकत नाही, पण डबल मास्क वापरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.