मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत यांना पत्राद्वारे दिली आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने विधीमंडळात मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्याबाबत काय निर्णय झाला याची माहिती खासदार सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना विचारली होती. त्याच्या उत्तरादाखल केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी हे पत्र खासदार अरविंद सावंत यांना पाठवले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू असून सर्व संबंधित विभागांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सांगितले की, ‘मुंबईच्या विकासात नाना शंकरशेठ यांचे मोलाचे योगदान आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे. त्याला आधीच फार विलंब झाला आहे. राज्य विधीमंडळात प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विलंब होण्याचे कोणतेही कारण नाही.’ केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिल्याने लवकरात लवकर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाना शंकरशेठ टर्मिनस होईल अशी आशाही खासदार सावंत यांनी व्यक्त केली आहे.
सौजन्य : दैनिक सामना