मुंबईचे आद्य शिल्पकार, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक, थोर समाजसुधारक नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्यासाठी शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा लोकसभेत घुमला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करावे. देर हो गई..दुरुस्त हो जाओ असे सांगत मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनस’ असे लवकरात लवकर नामांतर करावे, अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली.
अरविंद सावंत यांनी लोकसभेत शून्य प्रहरात नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनसच्या नामांतराची आठवण केंद्र सरकारला केली. ते म्हणाले, हिंदुस्थानातील रेल्वेचा पाया घालणारे नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला. त्याला सर्व विरोधी पक्षांनी मंजुरी दिली आणि हा प्रस्ताव निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. नाना शंकरशेट यांची 10 फेब्रुवारी रोजी 228 वी जयंती झाली. त्यावेळी केंद्र सरकार त्यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला देईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे घडले नाही. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, असे सांगतानाच देर हो गई है.. दुरुस्त हो जाओ असेही सावंत यांनी ठणकावून सांगितले.
नाना शंकरशेट प्रतिष्ठानची कृतज्ञता
खासदार अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत नाना शंकरशेट मुंबई सेंट्रल टर्मिनससाठी वारंवार आवाज उठवला. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याची कृतज्ञता नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ऍड. मनमोहन चोणकर यांनी व्यक्त केली. राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घेऊन नानांच्या कार्याचा यथोचित गौरव करावा, असेही ऍड. चोणकर यांनी सांगितले.