माजुद्दीन मरणाच्या दारात होता. त्याने तीन जवळच्या मित्रांना बोलावून घेतलं होतं. नवाजुद्दीन, रिवाजुद्दीन आणि मुल्ला नसरुद्दीन.
माजुद्दीन सांगू लागला, माझा इथला शेअर संपला. मी निघालो. जन्नतमध्ये मला काही कमी पडू नये, यासाठी काही रोख रक्कम बरोबर घेऊन जायचं ठरवलंय मी. पण, माझ्या मुलांवर, नातेवाईकांवर माझा विश्वास नाही. त्यांच्याकडे पैसे सोपवले, तर ते हडप करतील आणि माझी मरणोत्तर पंचाईत होईल. मी तुम्हा तिघांकडे प्रत्येकी दहा लाखांची रोख रक्कम, दोन हजाराच्या नव्या नोटांमध्ये, देतो आहे. ती तुम्ही मला दफन करताना शवपेटिकेत आठवणीने ठेवा. माजुद्दीनच्या अंत्यविधीनंतर शोकाकुल मित्रांचे पाय गम गलत करण्यासाठी मयखान्याकडे वळले. दोन-दोन प्याले रिचवल्यावर नवाजुद्दीन म्हणाला, दोस्तहो, मला एक कबुली द्यायचीये. माजुद्दीनची कबरीत पैसे सडवण्याची आयडिया काही मला पटली नव्हती. शिवाय, दोन हजाराची नोट कधीही रद्द होऊ शकते, म्हणतात. ते त्याला फारसे उपयोगीही नव्हते. मी त्याने दिलेल्या पैशांतले दोन लाख रुपये माझ्या अनाथाश्रमाकडे वळवले आणि आठ लाखच कबरीत टाकले. रिवाजुद्दीन म्हणाला, मी काही वेगळं केलं नाही. मी तर सरळ पाच लाख काढून घेतले माझ्या वृद्धाश्रमासाठी. त्यांची दुवा त्याला जन्नतमध्ये साथ देईल. पाच लाख पुरेसे आहेत त्याला तिकडे.
मुल्ला नसरुद्दीन म्हणाला, मरणशय्येवर मित्राला दिलेल्या वचनाचा भंग करण्याचं पातक माझ्या हातून काही घडलेलं नाही. मी संपूर्ण रक्कम त्याच्यासोबत पाठवली आहे. कोरा करकरीत चेक दिलाय कबरीत पूर्ण दहा लाखांचा. कॅशलेस इकॉनॉमीचा देशभक्त पाईक आहे मी!!!