मुल्ला नसरुद्दीनचं गाढव आता म्हातारं झालं होतं. त्याच्याच्याने काम होत नव्हतं, वजन वाहण्याची त्याची क्षमता घटली होती. हे गाढव येईल त्या किंमतीला विकायचं आणि त्यात थोडी भर घालून नवं, तरुण, दमदार गाढव विकत घ्यायचं, असा विचार करून तो बाजारात गेला.
या गाढवाला साधारण वीसेक मोहरा इतकी किंमत येईल आणि नवं जवान गाढव चाळीसेक मोहरांपर्यंत पडेल, असा त्याचा हिशोब होता.
बाजारात पोहोचल्यावर त्याने एका विक्रेत्याला गाठलं. त्याने दहा मोहोरांच्या कमिशनवर गाढव विकायची तयारी दर्शवली. तो मुल्लाला
म्हणाला, मी तुमच्या गाढवाचं ढीग गुणवर्णन करीन, पण, त्याच्यावर सहज बोली लावायला कोणी तयार होणार नाही. तुम्ही स्वत:च पाच मोहोरांच्या बोलीने सुरुवात करा. म्हणजे मग इतरही लोक बोली बोलू लागतील.
विक्रेत्याने गाढवाचं गुणवर्णन सुरू केलं, त्याचं बोलणं खरं असतं तर मुल्ला इतके दिवस अबलख अरबी घोडाच गाढव म्हणून पाळून बसला होता, असं वाटलं असतं कोणालाही. बोली बोलायचा इशारा झाल्यावर मुल्लाने पाच मोहोरांची बोली बोलली. कोणीतरी सात मोहोरांची बोली बोलला. गाडं दहा मोहोरांवर येऊन अडलं, तेव्हा आपल्या गाढवाच्या या गुणवर्णनाने भारावलेल्या मुल्लाने वीस मोहोरांची बोली बोलून टाकली. असं करत करत बोली चाळीस मोहोरांवर पोहोचली. विक्रेता आता व्यवहार गुंडाळणार, इतक्यात स्फुरण चढलेल्या मुल्लाने पन्नास मोहोरांची बोली लावली. त्यापुढे कोणी गेलं नाही.
मुल्लाने व्यवहाराच्या ठरलेल्या १० मोहोरा विक्रेत्याला देऊन आपल्या गाढवाच्या गुणवत्तेचा परिचय करून दिल्याबद्दल त्याचे आभार मानले आणि तेच मरतुकडं गाढव घेऊन तो अगदी आनंदात परतीच्या वाटेकडे वळला.