अभिनेता मिलिंद जोशी लवकरच निर्माते विकास वर्मा यांच्या जी-7 फिल्म्स पोलंड या बॅनरखाली ‘नो मीन्स नो’ या पहिल्याच इंडो-पोलिश चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही एक किशोरवयीन प्रेमकथा असून ती पोलंडमधील वेगवेगळ्या स्थळांवर शूट करण्यात आली आहे. यापूर्वी सलमान खानचा ‘किक’ या चित्रपटाचे चित्रीकरण पोलंडच्या वॉर्सा येथे तर आमीर खानच्या ‘फना’ या चित्रपटाचे शूटिंग पोलंडमधल्या झाकोपे येथे करण्यात आले होते. हिवाळ्यामध्ये येथील निसर्ग सौंदर्य काश्मीरसारखे निसर्गरम्य असते.
‘नो मीन्स नो’ या चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटन वाढविण्यासाठी आणि भारत आणि पोलंडमधील संस्कृतीशी संपर्क अधिक बळकट करण्याचा हेतू या सिनेमाच्या निर्मितीमागे असल्याचे बोलले जाते. या चित्रपटामध्ये मिलिंद जोशीसोबतच गुलशन ग्रोव्हर, शरद कपूर, दीप राज राणा, कॅट क्रिस्टियन, नाझिया हुसेन (अभिनेता संजय दत्त यांची भाची), ॲना अॅडोर, जर्सी हॅण्डझलिक, ॲना गुझिक, नतालिया बाक, स्लिव्हिया झेक आणि पावेल झेक असे भारतीय आणि पोलिश अभिनेते चमकणार आहेत. ‘नो मीन्स नो’ हा चित्रपट इंग्रजी, हिंदी आणि पोलिश या तीन भाषांमध्ये एकाचवेळी चित्रित होणार आहे.