नवे युद्ध, नवे योद्धे
देश युद्धं का लढतात?
अनेक राष्ट्रांची भोवतीच्या जास्तीत जास्त प्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची इच्छा असते. काही राष्ट्रांना किंवा महत्त्वाकांक्षी नेत्यांना तर ‘सब भूमी गोपाल की’च्या चालीवर जगातली सगळी भूमी आपल्या (म्हणजे आपल्या विचारसरणीच्या, धर्माच्या किंवा राष्ट्राच्या) वर्चस्वाखाली यावी, असं वाटत असतं, त्यातून युद्धं होतात. महायुद्धंही लढली जातात.
पण आताच्या काळात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने युद्ध लढण्याची गरज आहे का?
ती खरं तर दुसर्या महायुद्धानंतरच संपुष्टात आली. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या त्यानंतरच्या दोन महासत्तांमध्येही शीतयुद्ध लढलं गेलं, अंतराळातल्या वर्चस्वासाठी चढाओढ झाली. लक्षावधी सैनिकांचे बळी घेणारं युद्ध काही झालं नाही.
आज अमेरिका ही जगातली सगळ्यात मोठी महासत्ता आहे. हा देश आपल्या सीमेपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या, आपल्याशी थेट कोणताच संबंध नसलेल्या देशांमध्येही लष्करी कारवाई करतो. तिथल्या कारभारात थेट हस्तक्षेप करतो. पण हे निव्वळ प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी करावं लागतं. अमेरिकेचा प्रभाव काही या युद्धखोरीतून निर्माण होत नाही. तो निर्माण होतो तिच्या आर्थिक, बौद्धिक आणि व्यापारी ताकदीतून. आज जगातल्या सगळ्या भागांमधल्या तरुणाईला पॉपपासून हिपहॉपर्यंतचं संगीत आवडतं, त्यांच्या फॅशन्सपासून सिनेमा-टेलिव्हिजनच्या आवडींपर्यंत सगळ्यांवर अमेरिकेचा प्रभाव आहे, त्यांना शिकून अमेरिकेला जायची संधी हवी असते. जिथे मॅकडोनल्ड्स नाही, पिझा हट नाही आणि कोकाकोला विकला जात नाही, असा देश सापडणं मुश्कील आहे पृथ्वीच्या पाठीवर. यासाठी अमेरिकेला कुठे साधी गोळीही झाडावी लागत नाही. जिथे त्याहून मोठे हितसंबंध अडकलेले असतात तिथेच अमेरिकेची पोलिसगिरी चालते.
यापेक्षा बोलकं उदाहरण आहे चीनचं.
येत्या काही वर्षांतच हा देश अमेरिकेपेक्षा मोठ्या आर्थिक ताकदीचा देश होईल. या देशाने तर अमेरिकेच्या एक पाऊल पुढे मजल मारली आहे. अमेरिका अनेक देशांमध्ये थेट लष्करी हस्तक्षेप करते, आंतरराष्ट्रीय राजकारण अमेरिकेच्या आसाभोवती फिरते. चीनने या वावदूक भानगडींमध्ये न पडता, फारशी लष्करी ताकद न वापरता अमेरिकेला आव्हान उभं केलं आहे. ५० वर्षांपूर्वी जो देश भारतापेक्षा गरीब होता, तो आता निव्वळ वेगाने विकसित होणार्या अर्थव्यवस्थेच्या बळावर अमेरिकेच्या बरोबरीची महासत्ता बनायला निघाला आहे.
युद्ध कशासाठी करायचं असतं?
वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठीच ना?
युद्ध न करता, रक्ताचा थेंबही न सांडता वर्चस्व प्रस्थापित होणार असेल, तर सैनिकांचे बळी द्यायचे कशाला? शस्त्रसज्जतेवर अमाप पैसा खर्च करायचा कशाला? वर्चस्व वाढवण्यासाठी इतर देशांना धडा शिकवायचा, त्यांना उद्ध्वस्त करायचं, तर विमानं पाठवा, बाँब फेका, अणुबाँब टाका, त्यांचे काही लाख मारा, आपले काही लाख मरू द्या, ही सगळी कटकट सांगितली आहे कुणी?
साधा एक असाध्य आजारही सगळ्या जगाला जेरीला आणू शकतोच की!
गेल्या वर्षापासून जगाच्या मानगुटीवर बसलेला करोनाचा विषाणू नैसर्गिकरित्या तयार झालेला नाही, तो प्रयोगशाळेत बनवलेला आहे, असं अनेक तज्ज्ञ मानतात. चीनने पुकारलेलं हे जैविक युद्धच आहे, असाही अनेकांचा दावा आहे. हा दावा चीन कधीही मान्य करणार नाही. पण, ज्या करोनाने युरोप खंडाची, अमेरिकेची, भारताची प्रचंड वाताहत केली, अर्थव्यवस्थांना तडाखे दिले, त्या करोनाने आपल्या ‘मायदेशा’त कोणताच हाहाकार माजवला नाही, तिथली सगळी व्यवस्था थोड्याच काळात पूर्ववत झाली आणि आर्थिक विकासाचा वेग सगळ्यात जास्त राहिला, हे संशयास्पद आहेच.
हे नव्या युगातलं नवं युद्ध आहे. त्याची हत्यारं वेगळी आहेत, रणभूमी वेगळी आहे. जग जिंकण्यासाठी भूप्रदेश ताब्यात घ्यायची गरज नाही. त्या भूप्रदेशांमधली माणसं आपल्या व्यवस्थांची, यंत्रणांची गुलाम व्हावीत, हे ध्येय ‘शांततामय’ मार्गांनी साध्य करता येतंच. हेच चीनने दाखवून दिलं आहे.
त्याचबरोबर आणखीही एक युद्ध जगात सतत खेळलं जात आहे… हे आहे सायबर युद्ध. आज जगाच्या सगळ्या आर्थिक, सामाजिक व्यवहारांच्या केंद्रस्थानी आहे इंटरनेट. जगाला जोडणारं, सर्वसामान्यांना आवाज देणारं हे इंटरनेट आता अतिशय सफाईने लोकांना विविध विचारसरणींच्या अंकित करण्यासाठी वापरलं जाऊ लागलेलं आहे. ‘द ग्रेट हॅक’ या माहितीपटात सांगितलंय त्यानुसार सोशल मीडिया वापरणार्या प्रत्येक माणसाच्या बाबतीतले जवळपास ७० हजार टच पॉइंट म्हणजे स्वभाववैशिष्ट्यं, आवडीनिवडी या माध्यमांच्या चालकांपर्यंत आपोआप पोहोचतात. त्या आधारावर कोणीही तुम्हाला हॅक करू शकतं, आपल्या तालावर नाचवू शकतं आणि हे सगळं होत असताना आपण स्वत:च्याच तालावर नाचतो आहोत, असं तुम्हाला खात्रीने वाटत असतं.
हेच मोठ्या प्रमाणावर देशांतल्या मोठमोठ्या यंत्रणा, संस्था, सरकारं यांच्या बाबतीत सुरू असतं. डेटा म्हणजे विदा किंवा माहिती हे आजच्या काळातलं सोनं आहे. ते लुटण्याचे किंवा त्याला वेगळं वळण देऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय उलथापालथी घडवून आणण्याचे प्रयत्न सायबर जगतात सतत सुरू असतात. त्याचे फटके आपल्यालाही बसत असतात. गेल्या काही दिवसांत आपल्याकडच्या काही यंत्रणा हॅक झाल्या, त्याने अनवस्था प्रसंग ओढवला, अशी चर्चा आहेच. असे प्रसंग यापुढे वाढतच जाणार आहेत आणि त्यांची तीव्रताही वाढत जाणार आहे. त्यासाठी आपण सज्ज आहोत का?
ज्या प्रकारची प्रत्यक्ष रणभूमीवरची युद्धं आता फारशी लढलीच जाणार नाहीत, त्यासाठीच्या छप्पन्न इंची शौर्याच्या बाता मारत बसणं आपल्याला परवडणारं नाही. आपली विचारशक्तीच कह्यात घेणार्या आणि अधिक व्यापक आणि सखोल नुकसान पोहोचवणार्या या सायबर युद्धासाठी योद्धे तयार करणं हीच यापुढच्या काळातली खरी शस्त्रसज्जता असेल.